|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विसंवादाचा वितंडवाद होऊ देणार नाही!

विसंवादाचा वितंडवाद होऊ देणार नाही! 

जिल्हा भाजपच्या भूमिकेवर खासदार विनायक राऊत यांची प्रतिक्रिया

वार्ताहर / कणकवली:

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेना व भाजपमध्ये विसंवाद असतील पण आमच्यात वितंडवाद होऊ देणार नाही. युतीमधील ‘कम्युनिकेशन गॅप’ भरून काढत आम्ही एकत्रित समानतेने काम करू. भाजपने स्वत:चा उमेदवार म्हणून सुरेश प्रभू यांना उमेदवारी देण्याची मागणी करणे, यात गैर काहीच नाही. राज्याच्या नेतृत्वाकडे याबाबत काय चर्चा झाली, हे मला माहिती नाही. भाजप व शिवसेनेमध्ये वितुष्ट निर्माण करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न स्वाभिमानची टोळी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही करून रडीचा डाव खेळत आहे. असा रडीचा डाव खेळलात, तर स्वाभिमानची अनामतही शिल्लक राहणार नाही, अशी टीका खासदार विनायक राऊत यांनी केली.

येथील विजय भवनमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत राऊत यांनी शिवसेना- भाजप महायुतीच्या एकत्रित प्रचाराचा शुभारंभ कोल्हापूर येथून होणार आहे. दोन दिवसात महायुतीचे उमेदवार जाहीर होतील, असेही सांगितले. ते म्हणाले, प्रत्येक निवडणुकीला संजू परब यांची एक गाडी कशी जळते? या घटनेची सीआयडी चौकशीची मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येणार आहे. शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करीत भांडणे लावण्याचे काम स्वाभिमानची टोळी करीत आहे. सोशल मीडियाच्या आधारे खोटय़ा बातम्या पसरविण्याचे काम स्वाभिमानकडून करण्यात येत आहे.

स्वाभिमानकडून खोटय़ा बातम्या प्रसारित!

राऊत म्हणाले, नुकत्याच एका प्रसारित केलेल्या खोटय़ा बातमीबाबत मी दोन्ही जिल्हय़ांचे पोलीस अधीक्षक, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तक्रार करून संबंधितांवर सायबर क्राईम ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. स्वाभिमानच्या समाजद्रोही टोळक्याकडून निवडणुकीच्या तोंडावर असे काम करण्यात येत आहे. निवडणूक यंत्रणेच्या कामात व्यत्यय आणण्याचे काम स्वाभिमानकडून सुरू आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत नीलेश राणेंचा दिड लाख मतांनी पराभव केला. विधानसभेत नारायण राणेंचा शिवसेनेने पराभव केला. मात्र, यातून धडा न शिकलेले राणे आजही आपली दहशत, हाणामारी, मतदारांना भीती घालून निवडणूक जिंकण्याचे स्वप्न पाहत आहेत.

सर्वच गाडय़ा जळितांची चौकशीच करा!

राऊत म्हणाले, सावंतवाडीतील स्वाभिमानचे तथाकथित नेते संजू परब यांची गाडी जाळणारे तेच. गाडी जळताना पाहणारेही तेच. असे असताना पालकमंत्र्यांच्या नावाने शिमगा करण्याचे काम परब व नीलेश राणे करीत आहेत. कुडाळ येथील होंडा शोरुम, ऍड. उमेश सावंत किंवा बंडू गांगण यांच्या गाडय़ा कुणी जाळल्या याबाबत विशेष पथकाद्वारे चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार आहे. गाडय़ा जाळणे व मतदारांकडून सहानुभूती मिळविणे ही स्वाभिमानची नौटंकी आहे. विचाराने, विकासाने आमचा सामना करा. वैचारिक पद्धतीने ही निवडणूक लढविण्याची तुमच्यात हिंमत असेल, तर आमचे हे आव्हान स्वीकारा. गेल्या निवडणुकीत 1 लाख 51 हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत 2 लाख 51 हजाराने स्वाभिमानचा उमेदवार पराभूत होईल.

आठवले एनडीएसोबतच!

भाजप कार्यकर्त्यांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राऊत म्हणाले, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व आमदार प्रसाद लाड यांनी भाजप कार्यकर्त्यांची भूमिका ऐकून घेतली. दोन्ही पक्षांमधील विसंवाद नेते मिटविण्याचा प्रयत्न करतील. महायुती होऊ नये म्हणून प्रयत्न करणाऱयांचा मात्र भ्रमनिरास झाला, असे राऊत म्हणाले. आरपीआय आठवले गटाचा महायुतीला पाठिंबा असल्याच्या वक्तव्यावरून आरपीआयचे जिल्हाध्यक्ष रतन कदम यांनी स्वाभिमानला पाठिंबा दिल्याबाबत राऊत म्हणाले, आरपीआयचे नेते रामदास आठवले आजही एनडीएसोबत आहेत. आरपीआयच्या जिल्हाध्यक्षांच्या भूमिकेबाबतची दखल त्यांचे वरिष्ठ घेतील. भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी रोजगाराच्या मुद्यावर लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत केलेल्या वक्तव्याबाबत राऊत म्हणाले, जठार हे अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. त्यांनी पाच वर्षात विधानसभेत काम केले आहे.

कणकवली विधानसभा संघटक सचिन सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, युवासेना समन्वयक राजू राठोड, उपतालुकाप्रमुख राजू राणे, नगरसेवक सुशांत नाईक, रिमेश चव्हाण आदी उपस्थित होते.

संपर्कात अनेकजण!

भाजप नेते व पदाधिकाऱयांचा तुम्हाला जिल्हय़ात विरोध असताना मात्र भाजप नेते संदेश पारकर हे शिवसेनेच्या प्रचारात सक्रिय आहेत. पारकर शिवसेनेच्या संपर्कात आहेत का? या प्रश्नावर राऊत म्हणाले, भाजपचे संदेश पारकर, प्रमोद जठार, अतुल काळसेकर हे सर्वच माझ्या संपर्कात आहेत. कारण मी जिल्हय़ात नेहमीच येत असतो. एवढेच नाही, तर महाराष्ट्र स्वाभिमानचेही काहीजण माझ्या संपर्कात आहेत. त्यातील काहींचा आज शिडवणेत पक्षप्रवेश आहे.

Related posts: