|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जिल्हय़ात 150 ठिकाणी ‘सीसीटीव्ही’

जिल्हय़ात 150 ठिकाणी ‘सीसीटीव्ही’ 

लोकसभा निवडणुकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज : 12 भरारी पथके नियुक्त : 22 ठिकाणी तपासणी नाकी

  • 303 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
  • 42 जणांवर हद्दपारीची कारवाई
  • जिल्हय़ाबाहेरूनही मागवला पोलीस बंदोबस्त

 

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हय़ात लोकसभेची निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस खात्याकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हय़ात 22 ठिकाणी पोलीस तपासणी नाकी सुरू करण्यात आली आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांचा समावेश असलेली 12 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. बंदोबस्तासाठी जिल्हय़ाबाहेरून 1854 पोलीस, एसआरपीएफच्या चार कंपन्या, 236 होमगार्ड मागविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी दिली.

राजकीय गुन्हेगारी असलेल्या 303 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. 42 जणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येत असून त्यातील 19 जणांचे प्रस्तावही हद्दपारीसाठी प्रांताधिकाऱयांकडे पाठविण्यात आले आहेत. सतत अवैध दारुचे गुन्हे करणाऱया 50 जणांचेही हद्दपारीचे प्रस्ताव करण्यात आले आहेत. जिल्हय़ात 150 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत, असे गेडाम म्हणाले.

पोलीस, होमगार्डचे प्रशिक्षण

27 मेपर्यंत आचारसंहिता राहणार आहे. या आचारसंहिता कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये, निवडणूक शांततेत पार पाडावी यासाठी पोलीस खात्याकडून पूर्णपणे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हय़ातील पोलीस कर्मचारी, अधिकारी आणि होमगार्ड यांचे प्रशिक्षणही पूर्ण झाले आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हय़ात 915 मतदान केंद्रे आहेत. या सर्व मतदान केंद्रांच्या इमारतींची प्रत्यक्ष पाहणीही पूर्ण करून सुरक्षिततेची खात्री करण्यात आली आहे.

303 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

 निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हय़ात राजकीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करण्यात आली आहे. एकूण 303 जणांवर कारवाई करण्यात येणार असून त्यातील 203 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच या पूर्वीच्या निवडणुकीत ज्या-ज्या लोकांवर गुन्हे दाखल आहेत, अशा सर्वांवर कारवाई करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत 303 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली असली, तरी मतदानाचा दिवस जवळ येईल, त्याप्रमाणे आवश्यकतेनुसार प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणाऱया लोकांची संख्या वाढू शकते. या कारवाईबरोबरच 40 जणांकडून बंधपत्र घेण्यात आले आहे.

42 जणांवर हद्दपारी

गंभीर गुन्हे असलेल्या आणि सतत गुन्हेगारी करणाऱयांवर हद्दपारीची कारवाई करण्यात येत असून एकूण 42 जणांवर हद्दपारीची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे. त्यातील 19 जणांवर तात्काळ हद्दपारी करण्यासाठी कारवाईचे प्रस्ताव प्रांताधिकाऱयांकडे पाठविण्यात आले आहेत. तसेच जिल्हय़ात बेकायदेशी दारू वाहतूक करणाऱया व विक्री करणाऱयांवर सातत्याने कारवाई करूनसुद्धा पुनःपुन्हा काहीजण गुन्हा करीत असतात. अशा 50 जणांवर हद्दपारीची कारवाई प्रास्तवित करण्यात आली आहे. हद्दपारीच्या प्रस्तांवाची संख्याही वाढू शकते.

जादा 1854 पोलिसांची मागणी

लोकसभा निवडणूक काळात शांतता राखावी, यासाठी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात येणार असून जिल्हय़ाबाहेरून 18 पोलीस कर्मचारी तसेच एसआरपीएफच्या चार कंपन्या आणि 236 होमगार्ड मागविण्यात आले आहेत. या मागणीनुसार जिल्हय़ाबाहेरून पोलीस दाखल झाल्यानंतर जिल्हय़ात ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त लावला जाणार आहे.

बंदुका जप्त करणार

जिल्हय़ात शेती संरक्षण व स्व संरक्षणासाठी ज्यांनी बंदुका घेतल्या आहेत, परंतु त्यातील काहीजणांवर गुन्हे दाखल असतील तर अशांकडील बंदुका निवडणूक काळाकरीता जप्त करण्यात येणार आहेत. मात्र ज्यांच्यावर गुन्हे दाखल नाहीत व  शेती संरक्षणासाठी बंदूक परवाने घेतलेले आहेत, अशा लोकांकडून बंदुका जप्त करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नसून जिल्हाधिकारी यावर निर्णय देतील. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली.

150 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे

जिल्हय़ात होणाऱया चोऱयांचा छडा लागावा आणि निवडणूक काळात होणारे गैर प्रकार कॅमेऱयात टिपले जावेत, यासाठी जिल्हय़ातील प्रमुख शहरे, महामार्ग, प्रवेश द्वार, तपासणी नाके आणि काही महत्वाची ठिकाणे निश्चित करून 150 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हय़ावर सीसीटीव्ही कॅमेऱयाद्वारे पोलिसांची नजर राहणार आहे.

तसेच जिल्हय़ात असे काही गुन्हेगार आहेत की जामीन मिळालेला नसतानाही फरार आहेत, अशा गुन्हेगारांना अटक वॉरंट काढण्यात येत असून आतापर्यंत सहाजणांवर अटक वॉरंटची कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. 

12 भरारी पथकांची नियुक्ती

निवडणूक काळात होणाऱया प्रचारसभा, मिरवणुका यावर पोलिसांची नजर राहणार आहे. तसेच प्रचारसभांवेळी काही गुन्हा घडल्यास किंवा मतदारांना प्रलोभनासाठी सक्ती करण्याचे प्रकार घडल्यास त्यावर नजर ठेवण्यासाठी आणि तात्काळ कारवाई करण्याकतीरा जिल्हय़ात 12 भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हय़ात तीन विधानसभा मतदारसंघ असून प्रत्येक मतदारसंघात चार भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. या भरारी पथकांमध्ये वरिष्ठ पोलीस अधिकारी, कार्यकारी दंडाधिकारी, कनिष्ठ पोलीस अधिकारी, दोन पोलीस कर्मचारी आणि एक कॅमेरामन असणार आहे. तसेच निवडणूक काळात दारुची वाहतूक केली जात असेल किंवा निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या रकमेपेक्षा जादा रक्कम कुणी घेऊन जात असेल, तर त्याच्यावर नजर ठेवण्यासाठी जिल्हय़ात निवडणूक काळाकरीता 22 ठिकाणी पोलीस तपासणी नाकी सुरू करण्यात आली आहेत.

Related posts: