|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » रिफायनरी प्रकल्पासाठी संमतीपत्र घेण्याची मोहीम सुरू

रिफायनरी प्रकल्पासाठी संमतीपत्र घेण्याची मोहीम सुरू 

जमीनदारांकडून चांगला प्रतिसाद ‘कोकण जनकल्याण’चे सचिव महाजन यांची माहिती     

वार्ताहर/ राजापूर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नाणार परिसरातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पासाठीची अधिसूचना रद्द केल्यानंतरही याच ठिकाणी प्रकल्प व्हावा यासाठी समर्थकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. प्रकल्प समर्थक संघटनांनी प्रस्तावित प्रकल्पासाठी सशर्त संमतीपत्र घेण्याची मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेला चांगला प्रतिसाद लाभत असून अनेक जमीनदारांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती कोकण जनकल्याण प्रतिष्ठानचे सचिव अविनाश महाजन यांनी दिली.  

रत्नागिरी रिफायनरीच्या प्रस्तावित प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाने 18 मे 2017 रोजी जमीन अधिग्रहणासाठी काढलेली अधिसूचना रद्द केल्यानंतर स्थानिक  जमीनदार, प्रकल्पग्रस्त, प्रकल्पबाधित शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, बेरोजगार व्यापारी आयटीआय व अन्य विद्यार्थी यांनी समर्थक संघटनाची भेटीगाठी घेतल्या जात आहेत. मुख्यमंत्री, उद्योगमंत्री व शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केल्यानुसार ‘रिफायनरी उद्योगाला त्यांचा विरोध नाही व जमीन देतील त्या ठिकाणी शासन प्रकल्प करायला तयार आहे’ त्यामुळे आपण स्थानिक लोकांनी हा प्रकल्प पुन्हा नाणार व परिसरातच होण्यासाठी एकत्रित प्रयत्न करूया, असा निश्चिय अनेकांनी केल्याचे महाजन यांनी सांगितले.

जमीन दर व पॅकेज जाहीर न झाल्यामुळे ज्या जमीन मालकांनी पूर्वी संमतीपत्र दिलेली नव्हती व ज्यांनी पूर्वी असहमती पत्रे दिली होती त्यातील बरेच लोक संमती द्यायला पुढे येत असल्याचे महाजन यांचे म्हणणे आहे. ज्या गावांमधून संमती देणार नाहीत, त्या क्षेत्रांना वा जमिनींना वगळण्यात यावे व जी लोक नव्याने पण लगतच्या क्षेत्रामधून संमती द्यायला तयार आहेत त्यांची संमती घ्यावी, 13500 एकर ऐवजी कमी क्षेत्राचा प्रस्ताव हा शासनाला द्यावा, या सर्व बाबींवर चर्चाविनीमय प्रकल्प समर्थनार्थ संघटना करत असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे महाजन यांनी सांगितले.

या प्रस्तावित प्रकल्पामधून होणारा पर्यावरण पुरक सर्वांगिण विकास, स्थनिकांसाठी नोकरी व रोजगार आम्हाला हवा आहे. जमिनीला एकरी 30 लाख ते 40 लाख दराने रक्कम द्या व घरटी एक चांगल्या पगाराची नोकरी द्या, स्थानिक ठिकाणी विकासासाठी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, इंजिनिअरींग कॉलेज, फिशींग हार्बर, शेती संशोधन केंद्र अशा सामाजिक सोई सुविधा द्या, अशी मागणी करू लागल्याचे महाजन यांनी सांगितले. जनतेमधून झालेल्या मागणीमुळे रिफायनरी प्रकल्पासाठी आवश्यक जागा याच ठिकाणी उपलब्ध होईल, असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.

Related posts: