|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अपरिपक्वता!

अपरिपक्वता! 

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर देशातील अनेक नेते वाट्टेल ती भन्नाट निवेदने/वक्तव्ये करू लागले आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडलेली नाही. एका भाषणात त्यांनी जाहीरपणे कुविख्यात दहशतवादी हाफिज सईदला ‘हाफीजजी’ असे संबोधले आणि किटाळ उसळले. भाजपने हीच संधी घेऊन राहुल गांधींवर टीकास्त्र सोडले. काँग्रेसच्या एका प्रवक्त्याने मात्र त्यावर बालिश खुलासा केला. काँग्रेस आणि भाजप यांच्या दरम्यान राजकीय संघर्ष समजण्यासारखा आहे परंतु भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेसमोर पाक पुरस्कृत हाफिजला आंतरराष्ट्रीय दहशतवादी संबोधण्याचा मांडलेला प्रस्ताव चीनने अडविला. आतापर्यंत भारताने दहावेळा केलेल्या प्रयत्नात चीनने प्रत्येकवेळी खोडा घातला. आताही घातला असता, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुबळे व भित्रे आहेत, ते चीनच्या राष्ट्राध्यक्षांना घाबरतात, असे निवेदन ट्विटरद्वारे करून पाकिस्तानमधील प्रसार माध्यमांना हेडलाईन वृत्त दिले. एवढेच नव्हे तर चीनमध्ये भारतीय पंतप्रधानांबद्दलचे वृत्त प्रकाशित झाल्याने चीनलादेखील आसुरी आनंद झालेला असणार. लोकसभा निवडणुकीत काय बोलावे आणि काय बोलू नये आणि भारताच्या परराष्ट्रीय कूटनीतीवर भाष्य करताना आपल्या देशाच्या पंतप्रधानांचा पाडाव करणाऱया राहुल गांधी यांनी केलेला हा हल्ला देशहिताला निश्चितच बाधक असाच आहे. गेले कित्येक दिवस राहुल गांधी आणि त्यांची टीम वादग्रस्त विधाने करून भारतीय सैन्यदलाच्या मनोधैर्याचेही खच्चीकरण करीत होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, आपल्यावर पाहिजे ती टीका करा परंतु या देशाच्या सार्वभौमत्वाला, देशाच्या संरक्षण दलाचे, या देशाच्या सीमेवर लढणाऱया सैनिकांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण करू नका, अशी कळकळीची विनंती केल्यानंतरही काँग्रेसची पिलावळ जे काही बरळत राहिली त्याला निवडणूक आयोगानेच बांध घातल्याने बरे झाले. या लोकसभा निवडणुकीत देशातील सर्वसामान्य जनतेवर चर्चा कमी आणि देशाच्या संरक्षणाला, देशाच्या परराष्ट्र धोरणांवर  टीका करताना काही राजकीय नेत्यांचा तोल ढळत आहे. विदेशात फुकटची प्रसिद्धी मिळत असली तरीही त्याचा फारसा लाभ या अपरिपक्व नेत्यांना होणार नाही. उलटपक्षी आपल्या शेजारील शत्रू राष्ट्राला आपण मदत करतो आहे, याचे भान होणे आवश्यक आहे. केंद्रीय कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी गुरुवारी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेतून राहुल गांधी यांना परिपक्वपणे वागा व देशाला गांभीर्याने घ्या व बाळबोधपणा सोडण्याचा जो सल्ला दिला, ही काँग्रेससाठी एक चपराकच आहे. भारतीय परराष्ट्र धोरण वा कूटनीती ही ट्विटरद्वारे ठरत नसल्याचे त्यांनी नमूद केलेले आहे. हे करीत असताना राहुल गांधी चीनच्या वरिष्ठ अधिकाऱयांना कसे भेटतात, त्यांचे चीनशी कसे संबंध आहेत, यावर प्रकाशझोत टाकण्याचाही प्रयत्न रवीशंकर प्रसाद यांनी करून राहुल गांधी यांची विकेट घेतली. राहुल गांधी हे गेल्या दोन महिन्यात फार आक्रमक झाले आहेत व त्यांनी तसे झालेच पाहिजे. देशात विरोधी पक्षांचा बुलंद आवाज ऐकायला मिळायला हवा आणि एक युवा नेता वर येत असेल तर त्याचे स्वागत झालेच पाहिजे. तथापि, राष्ट्रीय पातळीवरील राजकीय नेत्यांनी कोणतीही निवेदने करताना त्यात धाडसीपणा अवश्य दाखवावा. तथापि, या देशाला मारक होईल, असे काही करणे उचित ठरणार नाही. कारण आज सारे जग भारताच्या निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहुतांश राष्ट्रांमध्ये जाऊन भारताचे चांगले संबंध प्रस्थापित करण्याचा स्तुत्य प्रयत्न केलेला आहे. चीन कारस्थानी आहे. पाकच्या विरोधात हे राष्ट्र कधीही जाणार नाही. पाकिस्तान आणि चीन यांच्यादरम्यान जी मैत्री आहे, ती केवळ भारतावर असलेल्या वक्रदृष्टीमुळे आणि त्यातूनच चीनसाठी पाकिस्तान ही एक बाजारपेठ आहे. ड्रगन हा कोणत्याच राष्ट्राला परवडणार नाही. भारतावर अनेकवेळा आक्रमण करण्याचा प्रयत्नही चीनने केलेला आहे. दोन वर्षांपूर्वी डोकलाम प्रकरणातून चीनने भारतावर आक्रमण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच याविषयी तात्पुरता तोडगा काढलेला आहे. अमेरिकेलाही आव्हान देणाऱया या ड्रगन राष्ट्राशी सामना करणे, ही तशी सोपी गोष्ट नाही. भारताच्या कितीतरी पटीने जास्त सैन्य, अत्याधुनिक शस्त्रे ही चीनकडे आहेत. ही वस्तुस्थिती राहुल गांधी यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या निवडणुकीत  राजकीयदृष्टय़ा लक्ष्य करण्यास हरकत नाही मात्र देशाच्या परराष्ट्र नीतीचे धिंडवडे अशा पद्धतीने काढले जाऊ नयेत की ज्यामुळे या देशाबद्दलची प्रतिमा विदेशात मलीन होईल. पाकिस्तानमध्ये कोणत्याही मोठय़ा हेडलाईन्स प्रसिद्ध झाल्या असल्या तरी राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला त्यामुळे फारसा लाभ होईल, असे वाटत नाही. भारत चीनच्या राष्ट्राध्यक्षाला घाबरतो, अशा पद्धतीची निवेदने करून देश दुबळा आहे, असे भासविण्याचा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा प्रयत्न हा निश्चितच घातक आहे. भारतातील निवडणुका या निव्वळ राजकीय स्वरुपाच्या आहेत व असाव्यात. देशाच्या परराष्ट्र धोरणाचे धिंडवडे ट्विटरवर काढून या देशाचे भले होणार की, राहुल गांधी यांच्या काँग्रेस पक्षाला त्याचा लाभ होणार? अशा पद्धतीची निवेदने करताना गंभीरपणे विचार झाला पाहिजे. प्रत्येक राष्ट्रीय पक्षाकडे विविध धोरणांसदर्भात सल्लागार असतात. काँग्रेस हा देशातील सर्वात जुना राष्ट्रीय पक्ष आहे व त्या पक्षाचे राहुल गांधी हे घराणेशाहीतून झालेले अध्यक्ष आहेत. पक्षाची परंपरा, रणनीती त्यांना माहीत आहे. त्यांच्या राजकीय सल्लागाराने त्यांना परराष्ट्र धोरणासंदर्भात सल्ला दिला नसल्यानेच त्यांनी ट्विटरद्वारे जे काही भाष्य केले त्यावरून खळबळ उडाली नाही तरच नवल! या देशातील पंतप्रधानांवर टीका करण्याचा पूर्ण अधिकार राहुल गांधी यांनाच असे नव्हे तर शरद पवारांनादेखील आहे. टीका किती बोचरी असावी, त्याची अनेक उदाहरणे भाजपच्या नेत्यांकडूनही पहायला मिळतात, तशी ती काँग्रेस व इतर राजकीय पक्षांकडूनही ऐकायला व पहायला मिळतात मात्र जिथे या देशाच्या सार्वभौमत्वाचा व परराष्ट्र धोरणाचा प्रश्न येतो, त्यावेळी या देशातील राजकीय नेत्यांनी परिस्थितीचे भान आणि तारतम्य बाळगलेच पाहिजे. राजकीय महत्त्वाकांक्षेपोटी देशाच्या राष्ट्रीय धोरणाची बाजी लावू नका. ते निश्चितच देशाला हानीकारक ठरणार.

 

Related posts: