|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » रहिमतपूर येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट

रहिमतपूर येथे अवैध धंद्यांचा सुळसुळाट 

वार्ताहर /रहिमतपूर :

गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेले रहिमतपूर आणि पंचक्रोशीतील अवैध धंदे पुन्हा जोमाने सुरु झाल्याने नागरिकांच्यातून संताप व्यक्त आहे. कोरेगांवच्या मावळत्या डीवायएसपी प्रेरणा कट्टे यांच्या कारवाईमुळे तालुक्यात मटका, जुगार अड्डे, चोरटी वाळू वाहतूक आदी प्रकार थंड पडले होते. कट्टे मॅडमच्या कारवाईमुळे शासकीय यंत्रणेचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे सामान्य नागरिकांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. कट्टे यांचा धसका घेतलेल्या अवैध धंदेवाल्यांना त्यांच्या बदलीने हत्तीचे बळ मिळाल्याचे नागरिकांमध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरु आहेत.

   रहिमतपूर आणि परिसरात चोरीछुपे मटका, जुगार, रात्री-अपरात्री वाळूच्या गाडय़ा बोभाट सुरु असल्याचे नागरिक सांगत असताना पोलीस यंत्रणा गप्प का ? असा सवाल विचारला जात आहे. राज्यात कागदोपत्री कारभारात प्रथम येणाऱया रहिमतपूर पोलीस ठाण्याच्या कारभाराबाबत लोकांच्यात उलटसुलट चर्चा सुरु आहेत. ठाण्याला दोन कारभारी पण रहिमतपूर भागात पोलिसी खाक्या दाखवणारे पीएसआय जगदाळे नंतरच्या काळात गप्प बसल्याने पोलीस ठाण्यातील श्रेयवाद याला कारण असल्याचे समजते.

 सध्या मोबाईलवरुन मटक्याचे आकडे फिरत असल्याने एजंट देखील आडोशाला असल्याने मटका व्यवसायाला सुगीचे दिवस असल्याचे सांगितले जाते. बेकायदेशीर प्रवाशी वाहतूक देखील रहिमतपूर पोलीस ठाण्याला लागूनच आहे. तरीदेखील प्रवाशांची मेंढरासारखी वाहतूक करणारी खासगी वाहने पोलिसांना दिसणार कधी? असेच परिसरात चित्र असल्याचे दिसते.

प्रेरणा कट्टेंची उणीव भासू लागली

कोरेगाव, रहिमतपूर, सातारारोड, पुसेगाव, खटाव, बुध आणि वाठारसह अनेक शहरातून प्रेरणा कट्टे यांनी अवैध धंद्यांवर टाच आणलेली होती. बहुतांशी हॉटेल्स व धाब्यांवर विकली जाणारी अवैध दारु व दोन नंबरचे धंदे त्यांच्या काळात बंद पडले होते. या शहरांतील बऱयाच फाळकुटदादांनी दोन नंबर धंद्यांना रामराम ठोकलेला होता. परंतु कट्टे यांची कोल्हापूर परिक्षेत्रात बदली झाल्यानंतर याच फाळकुटदादांनी आपली सांधी-कोपऱयात ठेवलेली सर्व गंजलेली हत्यारे पुन्हा परजायला सुरुवात केली असल्याचे लोक सांगतात. परिणामी दोन नंबरच्या धंद्यांना आता सुगीचे दिवस येणार असल्याचे बोलले जात आहे.

Related posts: