|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » क्रिडा » एमसीसीच्या प्रस्तावावर गावसकरांची कडाडून टीका

एमसीसीच्या प्रस्तावावर गावसकरांची कडाडून टीका 

मुंबई / वृत्तसंस्था :

कसोटी क्रिकेटमध्ये एकाच प्रकारचा चेंडू वापरण्याच्या एमसीसीच्या प्रस्तावावर माजी भारतीय कर्णधार सुनील गावसकर यांनी जोरदार टीका केली. मेरिलबोन क्रिकेट क्लबच्या (एमसीसी) जागतिक क्रिकेट समितीने उद्घाटनाच्या विश्व कसोटी चॅम्पियनशिपमध्ये एकाच प्रकारचा चेंडू वापरावा, असा प्रस्ताव यापूर्वी मांडला. त्यावर गावसकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. हा प्रस्ताव अंमलात आला तर ते दुर्दैवी ठरेल, असे गावसकर म्हणाले.

‘खेळपट्टय़ा एकाच प्रकारच्या ठेवता येतील. बॅट एकाच प्रकारच्या ठेवता येतील. पण, चेंडूही एकाच प्रकारचा ठेवला जाणे क्रिकेटची नजाकत संपुष्टात आणण्यासारखे असेल. हा बदल झाल्यास विदेशात, विभिन्न वातावरणात जाऊन खेळण्यातील आव्हानच शिल्लक राहणार नाही’, असे गावसकर यांनी पुढे नमूद केले. सध्याच्या घडीला भारतात एसजी चेंडू, इंग्लंड-विंडीजमध्ये डय़ूक्स तर ऑस्ट्रेलिया-दक्षिण आफ्रिकेसह काही देशात कुकाबुरा चेंडू वापरला जातो. असे न करता सर्व ठिकाणी एकाच प्रकारचा चेंडू असावा, अशी एमसीसीची सूचना आहे.

अलीकडील कालावधीत काही खेळाडूंनी देखील चेंडू कोणता असावा, याबद्दल आपली मते मांडली होती. भारतीय कर्णधार विराट कोहली व आघाडीचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन यांनी रेड डय़ूक्सला आपली पसंती दर्शवली होती. त्या पार्श्वभूमीवर गावसकर बोलत होते. भारताला आगामी विश्वचषकात किती संधी असेल, यावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. मात्र, भारत विश्वचषक जिंकू शकतो, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.