|Wednesday, October 16, 2019
You are here: Home » क्रिडा » फेडरर, नदाल उपांत्यपूर्व फेरीत, मुगुरूझा पराभूत

फेडरर, नदाल उपांत्यपूर्व फेरीत, मुगुरूझा पराभूत 

वृत्तसंस्था /कॅलिफोर्निया :

इंडियन वेल्स मास्टर्स बीएनपी पेरीबस आंतरराष्ट्रीय पुरूष आणि महिलांच्या टेनिस स्पर्धेत स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर तसेच स्पेनचा राफेल नदाल यांनी एकेरीची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. मात्र महिलांच्या विभागात स्पेनच्या मुगुरूझाचे आव्हान संपुष्टात आले आहे. कॅनडाच्या अँड्रेस्क्युने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

बुधवारी झालेल्या सामन्यात रॉजर फेडररने तासभराच्या कालावधीत ब्रिटनच्या एडमंडचा 6-1, 6-4 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले. पोलंडच्या हुरकेझने कॅनडाच्या नवोदित शेपोव्हॅलोव्हवर 7-6 (7-3), 2-6, 6-3 अशी मात करत या स्पर्धेत पहिल्यांदाच उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. फेडरर आणि हुरकेझ यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना होईल. दुसऱया एका सामन्यात स्पेनच्या राफेल नादालने फिलीप क्रेजनोव्हिकचा 6-3, 6-4 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. या स्पर्धेतील गेल्या तीन सामन्यामध्ये फेडरर आणि नदाल यांनी एकही सेट गमविलेला नाही. फेडररने ही स्पर्धा आतापर्यंत पाचवेळा तर नदालने तीनवेळा जिंकली आहे. कॅनडाच्या रेओनिकने जर्मनीच्या स्ट्रफचा 6-4, 6-3 असा पराभव करत शेवटच्या आठ खेळाडूंत स्थान मिळविले.