|Friday, May 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाण अवलंबितांचे शक्ती प्रदर्शन

खाण अवलंबितांचे शक्ती प्रदर्शन 

प्रतिनिधी /पणजी :

राज्यातील खाण अवलंबितांनी गुरुवारी येथील आझाद मैदानावर शक्ती प्रदर्शन  केले. राज्यातील खाणी त्वरित सुरु करण्यासाठी सरकारने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. याबात मुख्य सचिवांना एक निवेदन सादर केले आहे. खाणपट्टय़ातील हजारो खाण अवलंबित मोर्चात सहभागी झाले होते.

कांपाल मैदानावरून सुरु झालेला मोर्चा भाऊसाहेब बांदोडकर मार्गावरुन आझाद मैदानावर आला. यावेळी पुती गावकर, सुभाष वेलिंगकर, धर्मेश सगलानी, काँग्रेसचे नेते घनश्याम राऊत, तसेच अन्य उपस्थित होते. मोर्चाच्या दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून आझाद मैदान तसेच कांपाल मैदानावर मोठय़ा प्रमाणात पोलीस तैनात ठेवण्यात आले होते. दोन्ही ठिकाणानांना जणू पोलीस छावणीचे स्वरूप आले होते. मोर्चात पुरुषांबरोबरच महिलाही मोठय़ा संखेने सहभागी झाल्या होत्या.

खाणग्रस्तांवर उपासमारीची पाळी

राज्यातील खाण व्यवसाय हा मुख्य व्यवसाय असून त्याच्यावर लाखो लोक अवलंबून आहेत. हा व्यवसाय बंद झाल्याने या लोकांवर उपासमाराची पाळी आली आहे. एप्रिल 2018 मध्ये गोवा मायनिंग पिपल फ्रंट स्थापन करून खाणी पुन्हा सुरु करण्यासाठी आम्ही कित्येक दिवस लढा देत आहोत. त्याच्यात काही प्रमाणात यश येत असल्याचे दिसत आहे, असे पुती गावकर यांनी सांगितले.

प्रतिज्ञापत्र सादर करावे

राज्य सरकारची इच्छा असेल तर खाणी सुरु व्हायला वेळ लागणार नाही. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी केंद्र सरकारला एक पत्र लिहून दिले होते. खाणी सुरु व्हाव्यात, असे त्या पत्रात सविस्तर नमुद केले होते. हाच मुद्दा प्रतिज्ञापत्रात मांडून सर्वोच्च न्यायालयात सादर करावा अशी मागणी खाण अवलंबित करीत आहेत असेही पुती गावकर यांनी सांगितले.

याबाबत आज आम्ही मुख्य सचिवाना निवेदन सादर केले आहे राज्यातील खाणी सुरु होण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणार असल्याचे मुख्य सचिवांनी आम्हाला सांगितले आहे असेही गावकर म्हणाले.

Related posts: