|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » हजारो भाविकांच्या उपस्थितीत बाळूमामा मंदिराचा कलशारोहण सोहळा

हजारो भाविकांच्या उपस्थितीत बाळूमामा मंदिराचा कलशारोहण सोहळा 

प्रतिनिधी/ सेनापती कापशी

महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, गोवा राज्यातील भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कागल तालुक्यातील मूळ क्षेत्र मेतगे येथील श्री संत बाळूमामांनी स्थापन केलेल्या मंदिराचा कलशारोहण समारंभ भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बाळूमामा व हालसिध्दनाथांचा जयघोष करीत भंडाऱयाची               प्रचंड उधळण करण्यात आली. येथील एक हजारहून अधिक माहेरवासिनींची ओटी भरण्यात आली.

बाळूमामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या मेतगे गावात सद्गुरु बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने कलशारोहणाच्यानिमित्ताने गेली चार दिवस कलशाची मिरवणूक, होमहवन, कलश पूजा, देवता प्रतिष्ठापना आदी विधी पार पडले. भव्य अशा उभ्या करण्यात आलेल्या मंदिराचा 65 किलो वजनाचा कळस असून              सुप्रसिध्द मूर्तीकार एम. डी.  रावण (मुरगूड) यांनी बनवला आहे. सुमारे 57 फूट उंचीच्या शिखरावर हा कळस चढवण्यात आला. धर्मश्री तपोरत्न शिवसिध्द सोमेश्वर महास्वामीजी (मुक्तीमठ बेळगाव), श्री. ष. ब्र. प्र. 108 डॉ. निळकंठ शिवाचार्य स्वामीजी (आदीमठ संस्थान धारेश्वर), प. पू. भगवान गिरी महाराज (रामनाथगिरी समाधी मठ कसबा नूल) यांच्या हस्ते व श्रीमद् गिरीराज सुर्यसिंहासनाधिश्वर श्री श्री श्री श्री 1008 श्री शैलम जगद्गुरु डॉ. चन्नसिध्दराम पंडीताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, ह. भ. प. शिवाजीराव मोरे, ह. भ. प. डॉ. मानिकशास्त्राr मुखेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भक्तीमय सोहळा पार पडला.

आलेल्या या स्वामिजींची रथातून मंदिरापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. स्वामिजींच्यावतीने कलश व मूर्तींवर मंत्र संस्कार करण्यात आले व शिखरावर कलश चढवण्यात आला. सद्गुरु बाळूमामा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष पापा पाटील कौलवकर, बाबासाहेब पाटील, आर. डी. पाटील, दयानंद पाटील, बळीराम मगर, यांच्या हस्ते आजही कलशाची पूजा करण्यात आली.संपूर्ण गावातील गल्ल्यांमध्ये सडा रांगोळी रेखाटण्यात आली होती. शोभायात्रेत बाळूमामा व हालसिध्दनाथाच्या नावाने चांगभलंच्या गजराने संपूर्ण परिसर दणानून गेला हाता. ठिकठिकाणी फुलांची उधळण करण्यात आली. ही शोभायात्रा मंदिराजवळ आल्यानंतर भव्य मंडपामध्ये स्वामिजींचे पाद्यपूजन करण्यात आले. या भक्तीमय सोहळ्यानंतर उपस्थित हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

डॉ. निळकंठ स्वामीजी म्हणाले, सद्गुरु बाळूमामा यांनी कधीही भेदाभेद न मानता भक्तीचा मार्ग शोधला. त्यांच्या चरणाशी राहण्यातच आपले हीत आहे. त्यांनी सर्वसामान्य लोकांना सेवा आणि नामस्मरण करण्यास शिकवले. ह. भ. प. शिवाजीराव मोरे म्हणाले, सद्गुरु बाळूमामा हे वारकरी होते. दरवर्षी पंढरपूरला ते न चुकता येत होते. म्हणूनच तुकाराम महाराजांचे आपण वंशज तर आहोतच शिवाय विठ्ठल-रुक्मिणी मंदिर पंढरपूरचा प्रतिनिधी म्हणून आज याठिकाणी मी उपस्थित आहे. बाळूमामांच्या भक्तीचा महिमा हा वेगळाच आहे. राज्य व परराज्यातून या ठिकाणी असंख्य भाविक दरवर्षी येतात. यातच बाळूमामांचे महात्म्य दिसून येते. भगवानगिरी महाराज म्हणाले, संत बाळूमामांनी नामाचे महत्व जाणले होते. त्यांची अंतःकरणापासून देवावर श्रध्दा होती. म्हणूनच त्यांनी समाजाला त्या काळात नामाचे आणि ज्ञानाचे महत्व पटवून दिले होते.

यावेळी स्वागत बाबासाहेब पाटील यांनी केले. सूत्रसंचालन मधुकर भोसले यांनी केले. आभार बळीराम मगर यांनी मानले.

दरम्यान या सोहळ्याला पुणे म्हाडाचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, माजी आमदार संजयबाबा घाटगे, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांच्यासह अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.

Related posts: