|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कुणाचे दर्शन घेतले?

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कुणाचे दर्शन घेतले? 

दोन तासाच्या कोल्हापूर दौऱयाचे गूढ : गोपनीयता राखल्याने चर्चेला उधान

प्रतिनिधी/ कोल्हापूर

मुलगा डॉ. सुजय विखे-पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर सुरू झालेल्या चौफेर टीकेनंतर बुधवारी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील दोन तासांच्या कोल्हापूर दौऱयावर आले होते. अतिगोपनीय ठेवण्यात आलेल्या या दौऱयात करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी विखे-पाटील आल्याचे सांगण्यात आले, मात्र त्यांनी देवदर्शन टाळले. त्यांनी नेमके कुणाचे दर्शन घेतले? या संदर्भात आता चर्चेला उधान आले आहे.

   दरम्यान, विखे-पाटील हे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांना सुरक्षा व्यवस्था आहे. पण त्यांनी सुरक्षा न घेता खासगी कारमधून कोल्हापुरात प्रवास केला. विशेष म्हणजे त्यांच्या दौऱयाची स्थानिक काँग्रेसजनांना कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. मुलाच्या भाजप प्रवेशाने अडचणीत आलेल्या विखे-पाटील यांचे विरोधी पक्ष नेतेपदही धोक्यात आले आहे. त्यामुळे आगामी व्यूहरचनेसाठी ते प्रयत्न करत आहेत. कोल्हापूर भेटीत त्यांनी कुणाच्या भेटी घेतल्या याची माहिती उपलब्ध न झाल्याने भेटीचे गूढ वाढले आहे.

   विखे-पाटील बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास खासगी हेलिकॉफ्टरने कोल्हापूरच्या उजळाईवाडी विमानतळावर आले. या गोष्टीची कुणालाही कल्पना नव्हती. एका स्थानिक नेत्याच्या संबंधित व्यक्तीच्या कारमधून ते शहरात आले. ताराराणी चौकात त्यांनी कार बदलून दुसऱया कारमधून जाणे पसंद केले. कार बदलल्यानंतर ते तारारामी पार्क परिसरातील आपल्या मित्राच्या घरी भोजन केले. त्यानंतर त्यांची कार कागलच्या दिशेने गेली. तेथे ते कुणाला भेटले? या बाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. मात्र या भेटीनंतर ते पुन्हा उजळाईवाडी विमानतळावर गेले. तेथून ते पुणे किंवा तुळजापूरला रवाना झाल्याचे समजते. विमानतळावर आगमन होताच त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलणे टाळले. मी अंबाबाईच्या दर्शनासाठी आलो आहे, असे सांगत ते कारमध्ये बसले. दोन तासाच्या विखे-पाटील यांच्या कोल्हापूर दौऱयाची नंतर चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. प्रारंभी त्यांची कार ताराबाई पार्कात गेली. त्यानंतर कागलकडे गेल्याचे समजते. विखे-पाटील यांच्या दौरा गोपनीय राखण्यामागचे गूढ शेवटपर्यंत गूढच राहिले.

Related posts: