|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सांगलीत काँग्रेस कमिटीला टाळे ठोकले

सांगलीत काँग्रेस कमिटीला टाळे ठोकले 

प्रतिनिधी/ सांगली

 लोकसभा निवडणुकीत आघाडीच्या जागा वाटपात सांगली मतदार संघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्याच चर्चेमुळे शुक्रवारी काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कमिटीलाच टाळे ठोकले. सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने ही जागा काँग्रेसने सोडू नये, अशी मागणी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी केली.

लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून सांगली मतदारसंघात काँग्रेस नेते लढण्यास तयार नाहीत. जे इच्छुक आहेत, त्यांच्यात निवडून येण्याची क्षमता नाही. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून कॉंग्रेसच्या उमेदवारीसाठी ‘पहले आप’ अशीच स्पर्धा सुरू आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांच्या जागावाटपात सांगली मतदार संघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वाटय़ाला गेल्याचे वृत्त धडकले. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या बंगल्यावर प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. तेथे झालेल्या चर्चेनंतर कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात रवाना झाले. यावेळी मिरज शहराध्यक्ष संजय मेंढे, मनपातील विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, दिलीप पाटील, नगरसेवक संतोष पाटील, अमर निंबाळकर, रवी खराडे,  अमित पारेकर, बिपीन कदम, विलास बेले, अजित ढोले, अर्जून कांबळे, बाळासाहेब गुरव यांच्यासह कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

 स्व. वसंतदादा पाटील यांचा सांगली हा बालेकिल्ला आहे. एकेकाळी सांगलीतून देशाच्या काँग्रेसची सूत्रे हालत. त्यामुळे सांगली काँग्रेसच्याच ताब्यात पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. पाच वर्षे पक्ष टिकवला आणि वाढवला आम्ही. आंदोलने केली आम्ही आणि मुंबईत बसून घेतलेले निर्णय आपल्याला मान्य नाहीत. अशा संतप्त भावना व्यक्त करत कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीलाच टाळे ठोकण्याचा निर्णय घेतला. सांगली आमच्या हक्काची, सांगली मतदार संघ काँग्रेसलाच सोडला पाहिजे अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी फलक फडकवला. निषेध व्यक्त करून टाळे ठोकले. त्याचवेळी काँग्रेस नेते विशाल पाटील, जयश्रीताई पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, किशोर जामदार काँग्रेस कमिटीसमोर आले. त्यांनी टाळे काढायला लावले. यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना पृथ्वीराज पाटील यांनी सांगलीत कोणालाही उमेदवारी मिळू दे पण उमेदवार काँग्रेसचाच हवा. आम्ही सर्वजण मिळून पक्ष देईल त्या उमेदवाराच्या विजयासाठी रात्रंदिवस प्रयत्न करू अशी ग्वाही दिली. यापूर्वी सर्व नेत्यांच्या सहीने प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लीकार्जून खर्गे यांना पत्र दिले असल्याचे सांगितले. आज मदनभाऊ असते तर कार्यकर्त्यांवर ही वेळच आली नसती अशा भावना बजरंग फडतरे यांनी व्यक्त केल्या. जोरदार घोषणाबाजीनंतर सांगली मतदारसंघ काँग्रेसकडेच न राहिल्यास कार्यकर्त्यांच्या सहनशिलतेचा अंत होईल असा इशारा देण्यात आला. 

कुलूप घातले आणि लगेच काढले

 आक्रमक कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीला टाळे ठोकले. तोपर्यंत विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील, जयश्रीताई पाटील, किशोर जामदार हे काँग्रेस कमिटीकडे धावले. त्यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढून टाळे काढले.

 पृथ्वीराज पाटील दिल्लीला रवाना

कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालण्यासाठी शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील हे शुक्रवारी सायंकाळीच दिल्लीला रवाना झाले. संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीला ठोकलेले टाळे आपण तात्काळ काढले. पण कार्यकर्त्यांच्या भावना पक्षश्रेष्ठींच्या कानावर घालण्यासाठी शुक्रवारी सायंकाळीच दिल्लीला रवाना झालो आहोत. सकारात्मक निर्णय होईल, अशी माहिती पृथ्वीराज पाटील यांनी दिली.

 

Related posts: