|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » दादा घराण्याचे खच्चीकरण खपवून घेणार नाही : विशाल पाटील

दादा घराण्याचे खच्चीकरण खपवून घेणार नाही : विशाल पाटील 

प्रतिनिधी/ सांगली

 र्कॉग्रेसचा बालेकिल्ला असलेला सांगली लोकसभा मतदार संघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देणे हा वसंतदादांच्या घराण्याला संपवण्याचा विचार आहे. या विचारापाठीमागे असलेल्या झारीतील शुक्रचार्याचा शोध घेऊ, असा इशारा वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिला आहे. भाजपा उमेदवाराच्या ‘सेटलमेंटसाठी’ जागा स्वाभिमानीला सोडताय काय? असा सवालही त्यांनी केला.

 आघाडीच्या राजकारणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जागा देण्यास हरकत नाही, पण वसंतदादा घराण्याच्या साथीने ज्या पक्षाची वाढ झाली. त्यांनाच सांगलीची उमेदवारी देणे यामागे एक षड्यंत्र असल्याचा आरोप करतानाच आम्ही हे खपवून घेणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. सांगली लोकसभा मतदार संघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दिल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी काँग्रेस कमिटीला टाळे ठोकून जोरदार घोषणाबाजी केली. त्यावेळी कार्यकर्त्यांसमोर बोलताना विशाल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील आणि काँग्रेसचे आ. विश्वजित कदम यांच्यावर नाव न घेता टिकास्त्र सोडले.

 पाटील म्हणाले, सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. आता आम्ही सर्वजण एकत्र आलोय. उमेदवारी कोणालाही मिळू दे आम्ही या जिल्हय़ात काँग्रेसलाच विजयी करू. कदम घराण्यातील उमेदवार झाल्यास आम्ही पाठिंबा देऊ अन्यथा त्यांनी सुचवलेल्या उमेदवारच्या विजयासाठी काम करू अशी ग्वाही आधीच दिली आहे. वसंतदादा घराण्यातील व्यक्ती तेरा वेळा खासदार झाली आहे. या काळात राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात दादा घराण्याची ताकद दाखवून देण्यात आली आहे. भविष्यातही दादा घराण्याची ताकद आम्ही दाखवून देऊ असा इशारा देतानाच आघाडीच्या राजकारणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सामावून घेणे हे आम्ही समजू शकतो.

 खा. राजू शेट्टी आणि वसंतदादा घराण्याचे संबंध पूर्वीपासूनच चांगले आहेत. त्यांच्या स्वाभिमानी शेतकरी पक्षाची वाटचालही दादा घराण्याच्याच साथीने झाली आहे. अशा पक्षाला उमेदवारी सांगलीतून देणे म्हणजे दादा घराण्याला संपवण्याचा विचार आहे. आम्ही तो खपवून घेणार नाही. असा इशाराही त्यांनी दिला. कार्यकर्त्यांनो आणखी एक दिवस वाट पाहा. सांगली काँग्रेसकडेच राहील अशी ग्वाही त्यांनी दिली.

 पक्षासाठी कोणतीही निवडणूक लढवू  

 दादा घराणे हे काँग्रेसचे निष्ठावंत घराणे आहे. आम्ही पक्षासाठी ग्रामपंचायतीपासून राष्ट्रपतीपर्यंत पक्ष सांगेल ती निवडणूक लढवण्यास तयार आहोत. खासदारकीची निवडणूक हा तर आमच्या सवयीचा भाग असल्याचेही विशाल पाटील यांनी यावेळी सांगितले.

Related posts: