|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » उमेदवारीपासून पळ काढता, मग स्टंटबाजी कशाला?

उमेदवारीपासून पळ काढता, मग स्टंटबाजी कशाला? 

प्रतिनिधी/ सांगली

 पस्तीस वर्षे ज्यांच्या घरात खासदारकी आहे, पाच वर्षे राज्यमंत्रीपद भोगले ते दादा घराणे आणि विशाल पाटील सांगली लोकसभा निवडणूक लढवण्यापासून पळ का काढत आहेत? असा सवाल आ. विश्वजित कदम यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला. तर सांगली लोकसभा मतदार संघ स्वाभिमानीला सोडण्याचा कोणताही अधिकृत निर्णय अद्याप झालेला नसताना विशाल पाटील हे स्टंटबाजी करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

 सांगली लोकसभा मतदार संघ स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडल्याचे वृत्त पसरताच काँग्रेस कार्यकर्त्यांनी थेट काँग्रेस कमिटीला टाळे ठोकले. त्यावेळी या विचारामागे असणाऱया झारीतील शुक्राचार्यांना शोधून काढण्याचा इशारा विशाल पाटील यांनी दिला. त्यांचा अप्रत्यक्ष रोख आ. जयंत पाटील आणि आ. विश्वजित कदम यांच्यावर होता. त्यानंतर  काही वेळातच आ. विश्वजित कदम यांनी अस्मिता बंगल्यावर पत्रकार बैठक घेत आपली भूमिका जाहीर केली.

 ते म्हणाले, आमचे चुलते आ. मोहनराव कदम यांच्या विधानपरिषद निवडणुकीत विशाल पाटील यांनी केलेले पक्षविरोधी काम आम्ही केव्हाच विसरलो आहे. पक्ष जो उमेदवार देईल त्याच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय आ. मोहनराव कदम यांनी यापूर्वीच जाहीर केला आहे. काँग्रेसतर्फे विशाल पाटील, प्रतीक पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील इच्छुक आहेत. पण, आमचा कोणालाच विरोध नाही. पक्ष देईल त्याचे काम करण्याचा आमचा निर्णय आहे.

 विशाल पाटील हे कदम घराण्यातील उमेदवाराला जाहीर पाठिंबा देण्याची घोषणा करत आहेत. पण, स्वतःच्या भावाबद्दल त्यांची भावना कशी बदलली असा सवाल करून ज्यांच्या घरात 35 वर्षे खासदारकी होती, ते आता का पळ काढत आहेत. असा सवालही आ. कदम यांनी केला.

  प्रतीक सक्षम नसल्याचे विशाल पाटलांचे वक्तव्य

  विशाल पाटील यांच्या कुटनीतिवर टिकास्त्र सोडताना आ. विश्वजित कदम म्हणाले, पुण्यात हर्षवर्धन पाटील यांच्या बंगल्यावर जिल्हय़ातील सर्व नेत्यांची बैठक झाली होती. यावेळी प्रतीक पाटील यांच्या नावाची चर्चा झाली. आमची त्याला काहीच हरकत नव्हती. पण स्वतः विशाल पाटील यांनीच प्रतीक पाटील यांचा मतदार संघात संपर्क नसल्याचे सांगितले. ते लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सक्षम नसल्याचेही विशाल पाटील यांनीच सांगतिले. स्वतःच्या भावाबद्दल असे बोलता आणि आमच्याबद्दलच इतके प्रेम कसे दाखवता असेही आ. कदम यांनी स्पष्ट केले.

 खा.शेट्टी यांनी वर्धा, बुलढाणा, सांगली मागितले

 काँग्रेस, राष्ट्रवादीची  स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरची आघाडी ही नैसर्गिक आहे. खा. शेट्टी यांनी बुलढाणा आणि वर्धा मागितला होता. पण, त्या दोन्ही जागा देणे शक्य नसल्याने त्यांनी सांगलीची मागणी केली आहे. त्यावर पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे. पण, अधिकृत कोणताही निर्णय झालेला नाही. तरीही विशाल पाटील स्टंटबाजी करत आहेत. अद्याप काँग्रेस राष्ट्रवादीचीच जागा वाटप नाही. नाहक स्टंटबाजी न करता  हिंमत असेल तर त्यांनी निवडणूक लढवावी आम्ही त्यांच्या पाठीशी राहू असेही आ. कदम यांनी यांनी स्पष्ट केले.

विशाल पाटील यांचेच षड्यंत्र

 सांगलीची जागा स्वाभिमानी आघाडीला सोडण्यात षड्यंत्र असल्याचा विशाल पाटील यांनी केलेल्या आरोपाचा समाचार घेत आ. कदम म्हणाले, हम नही तो काई नही ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे त्यांनीच षड्यंत्र रचून सांगलीची जागा स्वाभीमानी शेतकरी संघटनेला देऊन स्टंटबाजी केली असण्याची शक्यता आहे. हिम्मत असले त्यांनी लढावे आम्ही मदतीस तयार आहोत.

      सांगली काँग्रेसलाच मिळण्यासाठी आपले प्रयत्न

  आ. विश्वजित कदम म्हणाले, सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे हा मतदार संघ काँग्रेसकडेच राहावा यासाठी आपण प्रयत्न केले. खा. राजू शेट्टी यांच्याशी दोन तास चर्चा केली आहे. पण, विशाल पाटील अथवा कोणीही यासाठी प्रयत्न केले नाहीत. मतदारसंघ स्वाभिमानीला सोडल्याच्या चर्चेवरून गोंधळ घालणाऱयांनी हा निर्णय होऊ नये यासाठी काय प्रयत्न केले. हे जाहीर करावे असे सांगतानाच पक्ष देईल तो निर्णय मान्य करून आम्ही पक्षाबरोबरच राहू अशी ग्वाही आ. कदम यांनी यावेळी दिली.

Related posts: