|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » माढय़ात देशमुखी लढतीची शक्यता

माढय़ात देशमुखी लढतीची शक्यता 

संकेत कुलकर्णी / पंढरपूर

माढा लोकसभा मतदारसंघात रोज नाविन्यपूर्ण घडामोडी होत आहेत. अशातच आता येणाऱया निवडणुकीत देशमुखी सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जात आहे.. शुक्रवारी दिवसभरातील घडामोडीत भाजपाकडून सुभाष देशमुख तर राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख यांचे नाव अग्रक्रमाने पुढे आले आहे. तरीदेखील याबाबतचा सस्पेन्स कायम आहे. कारण राष्ट्रवादीच्या दुसऱया यादीमध्ये माढय़ाचे गुढ ठेवले आहे.

 माढा लोकसभा मतदारसंघात पवारांनी या मतदारसंघातून माघार घेतली. पवारांचे नाव माढा मतदारसंघासाठी येताच भाजपाकडून सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे नाव पुढे आले. मात्र देशमुख यांनी ‘माढा मतदारसंघात निवडणूक लढणार असे मी कधीच म्हणालो नाही’ असे म्हणत एक नवीन ट्विस्ट निर्माण केला.

 माढा मतदार संघाच्या उमेदवारीसाठी पवारांच्या माघारी मोठी खलबते सुरू झाली. सुरुवातीला खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे नाव राष्ट्रवादीच्या उमेदवारीसाठी पुढे आले. विजयसिंह यांनी आपले पुत्र रणजितसिंह यांच्यासाठी हट्ट धरला. यावेळी मोहिते-पाटील विरोधकांकडून प्रभाकर देशमुख यांच्या नावाचा जोर वाढला. प्रसंगी मोहिते पाटलांनी भाजपच्या दारी जाऊन धक्कातंत्राचा वापर केला. राष्ट्रवादीची उमेदवारी पदरात पाडून घेण्यासाठी एक पाऊल पुढे टाकले. अशातच गुरुवारी विजयसिंह मोहिते पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली मात्र कुठे माशी शिंकली याचा पत्ता नाही. कारण अचानकपणे गुरुवारी रात्रीपासून प्रभाकर देशमुख यांचे नाव माढा मतदारसंघासाठी अग्रणी आले आहे. याशिवाय शेवटच्या क्षणासाठी रणजीतसिंह मोहिते-पाटील आणि संजय शिंदे यांच्याही नावाचा विचार सुरू आहे.

  राष्ट्रवादीच्या सोबतीनेच भाजपामध्ये माढा मतदार संघाबाबतीत घडामोडी घडल्या. यामध्ये संजय शिंदे यांच्या उमेदवारीवर खलबते झाली. रणजितसिंह मोहिते-पाटील यांना भाजपने कुंपणावर ठेवत उमेदवारीची आशा लावली. अशा परिस्थितीत माढा मतदारसंघासाठी भाजपाचे उमेदवार म्हणून सुभाष देशमुख यांचे नाव सर्वार्थाने पुढे येते आहे. राष्ट्रवादीकडून प्रभाकर देशमुख आणि भाजपाकडून सुभाष देशमुख अशा लढतीची सध्या शक्यता निर्माण झाली आहे. जर घडले तर निश्चितच मोहिते-पाटलांची भूमिका या निवडणुकीसाठी काय…? यावरच निवडणुकीला खऱया अर्थाने रंग चढणार आहे.

 

गडकरींच्या विधानाला कार्यकर्त्यांची पुष्टी

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी शरद पवार हे अनुभवी नेते आहेत ते ऐनवेळी माढा मतदारसंघातून निवडणूक लढतील असे विधान केले. याला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून पुष्टी मिळत आहे. त्यामुळे पवार हेच माढय़ातून लढतील ? यावर आता तर्कवितर्क लढवले जात आहेत.

 

चंद्रकांतदादांच्या घोषणेचे केंद्र माढा की अकलूज

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिह्यातील मोठे राजकीय घराणे येत्या काही दिवसात भाजपमध्ये येईल अशी घोषणा केली. या चंद्रकांतदादाच्या घोषणेचे केंद्र सोलापूर जिह्यातील माढा का अकलूज आहे. याची देखील मोठी कुजबुज सध्या जिह्यात रंगताना दिसत आहे.

 

Related posts: