|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मुंबई पुल दुर्घटनेने घेतला जिल्हय़ातील दोघींचा बळ

मुंबई पुल दुर्घटनेने घेतला जिल्हय़ातील दोघींचा बळ 

वार्ताहर/ राजापूर, पालगड

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरूवारी सायंकाळी पादचारी पूल कोसळून झालेल्या अपघातात रत्नागिरी जिल्हय़ातील दोघींना जीव गमवावा लागला. राजापूर तालुक्यातील ससाळे बौध्दवाडी येथील रजनी तांबे व दापोली तालुक्यातील पालगड येथील भक्ती राजेंद्र शिंदे या दोघींचा या दुर्दैवी घटनेत मृत्यू झाला. या दोघीही सीएसएमटी परिसरातील जीएसटी हॉस्पिटलमध्ये परिचारीका म्हणून कार्यरत होत्या.  डोंबिवली येथे वास्तव्यास असलेल्या या दोघी रात्रपाळीसाठी निघाल्या असतानाच ही दुर्घटना घडली. 

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील हिमालय पादचारी पूल गुरूवारी सायंकाळी कोसळला. यात 5 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये राजापूर तालुक्यातील ससाळे येथील रंजना उमाजी तांबे यांचा समावेश आहे. रंजना नोकरीनिमित्त डोंबिवली येथे आईसोबत त्या वास्तव्यास होत्या. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परीसरातील जीएसटी हॉस्पीटलमध्ये त्या परिचारीका म्हणून कार्यरत होत्या. त्या अंपग असल्याने नजीकचा मार्ग म्हणून ये-जा करण्यासाठी हिमालय पादचारी पूलाचा वापर करीत असत.

 रंजना तांबे व त्यांच्या दोन मेत्रिणी या रात्रपाळीसाठी हॉस्पीटलला निघाल्या असतानाच पुल कोसळल्याची घटना घडली. यात रंजनासह त्यांच्या तीन सहकाऱयांचाही मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक भाऊ, आई, तीन बहीणी असा परीवार आहे. रंजना तांबे व त्यांच्या सहकाऱयांवर डोंबिवली येथील स्मशानभूमीमध्ये एकाच वेळी अंतिम संस्कार करण्यात आले. 

पालगडच्या भक्ती शिंदेंचाही मृत्यू

याच दुर्घटनेत दापोली तालुक्यातील पालगड येथील भक्ती राजेंद्र शिंदे (40, सध्या डोंबीवली) यांचाही मृत्यू झाला. भक्ती शिंदे यांचे माहेर देवगड येथील असून येथील गावकर या कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा विवाह पंधरा वर्षांपूर्वी पालगड फणसवाडी येथे राहाणाऱया राजेंद्र शिंदे यांच्याशी झाला.

   महिन्याभरापूर्वी त्या पालगड येथे आपल्या नातेवाईकांकडे आल्या होत्या. तोच त्यांचा शेवटचा गावाकडील प्रवास ठरला. सणानिमित्त त्यांचे गावी येणे जाणे असायचे. जीटी हॉस्पिटल येथे अनेक वर्षापासून कार्यरत होत्या.

  भक्ती यांचा मुलगा आता 9 वीची परीक्षा देत आहे. त्यांच्या पश्चात पती, मुलगा असा परिवार आहे. दरम्यान, मुंबईतील पूल मृत्यूचे सापळे बनले आहेत. त्यामुळे आणखी किती दुर्घटनेची वाट बीएमसी व रेल्वे बघतेय, असा संतप्त सवाल शिंदे यांच्या नातेवाईकांनी  केला आहे.

Related posts: