|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महिला विश्वाचे दस्तावेजीकरण आवश्यक

महिला विश्वाचे दस्तावेजीकरण आवश्यक 

प्रतिनिधी/ सातारा

गेल्या काही वर्षांपासून महिलांच्या विश्वात मोठे बदल घडून येत आहेत. बदलांची नोंद ठेवले जाण्याची गरज सामाजिक कार्यकर्त्या ऍड. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केली. महिलांच्या कामाचे वेळोवेळी दस्तावेजीकरण न झाल्याने स्त्रियांच्या चळवळी, कर्तृत्ववान महिलांबाबत पुरेशी माहितीच नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.

जागतिक महिला दिनानिमित्त कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सेंटर फॉर इंटरनेट ऍण्ड सोसायटी आणि लेक लाडकी आशिया यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी विकिपीडिया संपादन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या शिबिराचे उद्घाटन ऍड, वर्षा देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले.

सेंटर फॉर इंटरनेट ऍण्ड सोसायटीचे सुबोध कुलकर्णी यांनी विकिपीडियावर माहितीची भर घालण्याचे प्रशिक्षण महाविद्यालयीन विद्यार्थिनींना दिले. या कार्यशाळेत केबीपी यांत्रिकी महाविद्यालय, यशवंतराव चव्हाण इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स, आर्यांग्ल वैद्यकीय महाविदयालय आणि गौरीशंकर बी-फार्मसी या चार महाविद्यालयातील सदस्य सहभागी झाले. एकूण 22 व्यक्तींनी सक्रीय सहभागी होवून जवळपास 150 लेखांमध्ये संपादने केली. या कार्यशाळेत महिला व बालविकास कायदे, छेडछाड विरोधी कायदा, जातपंचायत प्रथा निर्मुलन कायदा, कौटुंबिक हिंसाचार कायदा, स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन विरोधी कायदा, गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा असे आठ ते दहा नवीन लेख तयार केले गेले. या लेखनात धनश्री जाधव, निकिता रासकर, माधवी निकम, कोमल जाधव, गीतांजली तांदळे, ऋतिका पवार, क्षितिजा लोंढे, ऋतुजा निकम इत्यादी सदस्यांनी योगदान केले. यावेळी प्राचार्य डॉ. ए. सी. आतार, प्रा. दीपाली घाटगे आदींची होती.

सुबोध कुलकर्णी म्हणाले, आपल्या समस्यांविषयी इंटरनेटवर सर्च करणाऱया महिलांची संख्या प्रचंड असूनसुद्धा ज्ञाननिर्मितीत महिलांची हिस्सेवारी जगभरात अवघी नऊ टक्के आहे. महिला संशोधकांवरही लिखाण नसल्यामुळे इंटरनेटवर त्यांच्याविषयीची पाने कोरी आहेत. प्रा. तेजश्री गुरव यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. आर. ए. थोरात यांनी आभार मानले. ऍड. शैलजा जाधव आणि दीपेन्ती चिकणे यांनी शिबिरासाठी सहकार्य केले.

Related posts: