|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्राथमिक सर्व्हे करण्याचे आदेश

प्राथमिक सर्व्हे करण्याचे आदेश 

वार्ताहर/ औंध

खटाव, माण, कोरेगाव तालुक्यातील 165 गावांचे प्राथमिक सर्वेक्षण, तसेच सातारा जिह्यातील प्रकल्पांचे व वंचित गावांचे ऑडिट करण्याच्या सूचना कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांनी केल्या.

येथील राजवैभव प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय जगदाळे यांनी बेमुदत उपोषण औंध येथे सुरू केले होते. त्यानंतर पुणे येथे जलसंपदा विभागातील अधिकाऱयांसमवेत बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले व तसे लेखी पत्र जगदाळे यांना दिले होते. या पत्रानुसार चार दिवसानंतर त्यांनी आपले उपोषण स्थगित केले होते.

सोमवारी कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांच्या समवेत दत्तात्रय जगदाळे, सातारा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे, कार्यकारी अभियंता बक्षी, उरमोडीचे कार्यकारी अभियंता एम.एस. धुळे, व्ही. बी. जाधव, केशव मदने, उध्दव कचरे, मज्जिद खोत, प्रशांत कुंभार, मारूती जाधव, आनंद सावंत, अजमल आदी प्रमुख मान्यवरांची बैठक पुणे येथील सिंचन भवन येथे पार पडली. या विषयांवर सविस्तर चर्चा केली, त्यामुळे होणारे नुकसान अवाजवी खर्च निदर्शनास आणून दिला.  त्यामुळे  कोणत्याही परिस्थितीत वंचित 165 गावांना सुक्ष्म सिंचनाद्वारे शेतीचे पाणी मिळावे यासाठी प्रशासनाने सकारात्मक कार्यवाही करण्याची मागणी केली. या भागात वारंवार दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या सर्व बाबींचा विचार करून कार्यकारी संचालक खलील अन्सारी यांनी सकारात्मक पावले उचलत सातारा पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता विजय घोगरे यांना वरील सर्व गावांचे प्राथमिक सर्वेक्षण करून, सातारा जिह्यातील प्रकल्प, वंचित गावांचे वॉटर ऑडिट करण्याच्या सूचना केल्या. खटाव, माण, कोरेगाव तालुक्यातील 165 गावांचे प्राथमिक सर्वेक्षण, जिह्यातील प्रकल्पांचे व वंचित गावांचे ऑडिट करण्याच्या सूचना कार्यकारी संचालक अन्सारी यांनी दिल्याने या भागात लवकरच निधीची पूर्तता होणार आहे.

तसेच या भागात वारंवार दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याने मोठय़ा प्रमाणात स्थलांतर होत असल्याचे निदर्शनास येत आहे, त्यामुळे अन्सारी यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून याची लवकरच अंमलबजावणी केली जाणार आहे. या निर्णयामुळे समाधान व्यक्त केले जात आहे.