|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खैरलांजी कटाला संरक्षण देणाऱयाला तिकीट कसे?

खैरलांजी कटाला संरक्षण देणाऱयाला तिकीट कसे? 

प्रतिनिधी/ सातारा

2006 साली राज्यात खैरलांजीचे अमानुष हत्याकांड घडले. त्यावेळी जे नाना पटोले भाजपमध्ये त्यांनी खैरलांजीच्या कटातील आरोपींना फक्त संरक्षणच दिले नाही, तर ते कटाच्या मागे होते. त्या खैरलांजी प्रकरणातील बदनाम पटोलेंना काँग्रेसमध्ये घेवून नागपूरची उमेदवारी देण्यामागे नितीन गडकरी यांचा रस्ता साफ करुन देण्याचा काँग्रेसचा हेतू दिसतोय. मग बहुजन वंचित आघाडीला भाजपची ‘टीम बी’ म्हणणारी काँग्रेस ‘भाजपची बी टीम आणि आरएसएसची ए टीम’ आहे काय?, असा सवाल वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते व माजी आमदार लक्ष्मण माने यांनी केला.

खैरलांजी घटनेतील 11 पैकी दोन आरोपींना फाशीची शिक्षा झालीय तर इतर सहा आरोपींना 25 वर्षांची जन्मठेप सुनावण्यात आलीय आणि 3 आरोपींना पुराव्याअभावी न्यायालयाने सोडून दिले. या भयंकर घटनेच्या कटाला संरक्षण देणारे नाना पटोले हे भंडारा जिल्हय़ातील मात्र भाजपमध्ये असलेल्या पटोलेंना काँग्रेसमध्ये घेवून आता त्यांना नागपूरमधून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांचा रस्ता साफ करण्याचा काँग्रेस हेतू दिसतो. मग वंचित बहुजन आघाडीला भाजपची टीम बी म्हणणाऱया काँग्रेसला आता काय म्हणायचे?, असा सवाल करुन माने यांनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले.

काँग्रेसने घोडय़ावरुन खाली उतरावे

आघाडी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला एक देतो, दोन जागा देतो असे म्हणणाऱया काँग्रेसचे राज्यात फक्त दोन खासदार आहेत. काँग्रेसचा ताल बिघडत चालला असून काँग्रेसने घोडय़ावरुन खाली उतरण्याची गरज आहे. काँग्रेसची वाटचाल अशीच राहिली तर उत्तरप्रदेशात जशी काँग्रेसची अवस्था झाली आहे तशीच महाराष्ट्रात होईल. वंचित बहुजन आघाडीला भाजपची टीम बी म्हणणाऱया काँग्रेसनेच आत्मपरिक्षण करण्याची गरज असल्याचा सल्ला माने यांनी दिला.

पवार मित्र; राजकीय गाईड नव्हेत!

दरम्यान, एकीकडे आपण शरद पवार यांच्याशी मित्रत्व जपताय आणि दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना विरोध करताय असे विचारले असता माने म्हणाले, शरद पवार यांच्याशी माझी 40 वर्षांपासूनची मैत्री आहे. ते माझे चांगले मित्र आहेत राजकीय गाईड नव्हेत. त्यांच्या जीवनातील सर्व चढउतार पाहिले आहेत. मात्र, मैत्री व राजकारण हे वेगवेगळे विषय आहेत. त्यात सरमिसळ करु नका.

साताऱयाची उमेदवारी फाईनलच

वंचित बहुजन आघाडीने सातारा लोकसभेची उमेदवारी फाईनल केली असून एस. के. अहिवळे यांचे नाव फाईनल झाले आहे. त्यामुळे त्यात काहीही बदल होणार नाही. ते स्थानिक नसल्याचा आरोप होत असल्याचे निदर्शनास आणून देताच माने म्हणाले, वंचित, भटक्यांना कसला निकष लावताय स्थानिक आणि बाहेरचा म्हणून. जगण्यासाठी भटकावेच लागते. अहिवळे पंढरपूरला पोटासाठी गेले होते आता साताऱयातून निवडणूक लढवतील, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: