|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » श्री दामोदराच्या दर्शनाने सावईकरांचा प्रचार सुरु

श्री दामोदराच्या दर्शनाने सावईकरांचा प्रचार सुरु 

प्रतिनिधी/ वास्को

दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर यांनी शुक्रवारी वास्कोतील ग्रामदैवत श्री दामोदराचे दर्शन घेऊन मुरगाव तालुक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला प्रारंभ केला. यावेळी आमदार कार्लुस आल्मेदा यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

सकाळी साडे नऊच्या सुमारास आमदार कार्लुस आल्मेदा, नगरसेवक दीपक नाईक, यतीन कामुर्लेकर, वास्को भाजपा मंडळ अध्यक्ष राजेंद्र डिचोलकर, ज्येष्ठ कार्यकर्ते संतोष लोटलीकर, उमेश साळगांवकर, विनायक घोंगे, संतोष केरकर, जयंत जाधव व भाजपाच्या इतर ज्येष्ठ व मान्यवर कार्यकत्यांच्या उपस्थितीत खासदार सावईकर यांनी देवाचे आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला.

अनेकांच्या घेतल्या गाठीभेटी

प्रचाराच्या प्रारंभानिमित्त सावईकर यांनी  वास्को मतदारसंघातील नगरसेवक, वास्को भाजपा मंडळ अध्यक्ष, युवा अध्यक्ष, महिला मोर्चा अध्यक्ष व कार्यकत्यांच्या भेटीही घेतल्या. तसेच वास्कोतील समूहांच्या प्रमुख व काही मान्यवरांच्या भेटी त्यांनी घेतल्या व त्यांच्याशी निवडणुकीसंबंधी चर्चाही केली. 

एमपीटी कामगारांच्या समस्याही घेतल्या जाणून

सावईकर यांनी एमपीटी कामगारांच्या समस्याही जाणून घेतल्या. त्यांच्या समस्यांवर चर्चाही यावेळी झाली. सावईकर यांनी एमपीटीच्या कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. यावेळी कामगारांनी त्यांना निवेदनही सादर केले. नगरविकासमंत्री मिलिंद नाईक त्यांच्यासोबत होते. 

मुरगाव तालुक्यात प्रचाराला प्रारंभ करताना खासदार नरेंद्र सावईकर यांनी पुन्हा दक्षिण गोव्यातून विजयी होण्याचा विश्वास व्यक्त केला. दक्षिण गोव्यात मागच्या पाच वर्षात भरीव विकास कामे झालेली आहेत. जनतेचा भाजपा सरकारच्या कार्यक्षमतेवर विश्वास आहे. जनतेला विकास हवा आहे. त्यामुळेच भाजपाला पुन्हा विजयाची खात्री असल्याचे ते म्हणाले.

नगरसेवक दीपक नाईक यांच्या बायणा येथील कार्यालयात तसेच नवेवाडे व वास्को मतदारसंघातील इतर भागातील कार्यकर्त्यांच्या सावईकर यांनी भेटी घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले. या प्रचार दौऱयात त्यांनी पक्षाशिवाय अन्य काही महत्वाच्या लोकांच्याही गाठीभेटी घेतल्या.

Related posts: