|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लक्ष्मीकांत पार्सेकरांची अखेर माघार !

लक्ष्मीकांत पार्सेकरांची अखेर माघार ! 

प्रतिनिधी/ पणजी

एका अत्यंत महत्त्वपूर्ण घडामोडीत भाजप नेते व माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यात अचानक महापरिवर्तन झाले आणि काल शुक्रवारी त्यांनी निवडणुकीतून माघार घेतली. भाजपसाठी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठीच या निर्णयाप्रत आपण आलो, असे निवेदन त्यांनी केले. काणकोणच्या रमेश तवडकर यांच्यानंतर पार्सेकर यांनी घेतलेल्या माघारीमुळे पक्षातील संभाव्य फूट टळली आहे. एवढेच नव्हे तर या निर्णयामुळे दयानंद सोपटेंचा मार्ग मोकळा झाला. त्याचबरोबर उत्तर गोव्यात श्रीपाद नाईक यांच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची घटना ठरली आहे.

बंडाचा झेडा हाती घेऊन भाजप नेत्यांवर उघड टीका चालविलेल्या भाजपचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी अखेर नमते घेत तडजोडीचा मार्ग स्वीकारला. गाभा समितीच्या प्रमुख नेत्यांसोबत गुरुवारी रात्री बैठक झाल्यानंतर पार्सेकर यांनी आपली भूमिका बदलली. आपण मागील तीस वर्षे भाजपचाच कार्यकर्ता असून भाजपसाठीच काम करणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी आपण काम करणार असल्याचे ते म्हणाले.

सोपटेंमुळे पार्सेकर बनले होते आक्रमक

काँग्रेसचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्यानंतर पार्सेकर यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्यावर त्यांनी जहरी टीका चालविली होती. एवढेच नव्हे तर पक्षाच्या केंद्रीय नेत्यावरही त्यांनी टीका केली होती. आपण अपक्ष उमेदवारी भरणार असल्याचेही पार्सेकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले होते. एवढेच नव्हे तर हल्लीच त्यांनी मतदारसंघात जाहीर सभा घेऊन आपली ताकदही दाखवून दिली होती. आपल्यावर पक्षाच्या नेत्यांनी कसा अन्याय केला हेही त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले होते. मात्र आता अचानकपणे पार्सेकर यांनी पवित्रा बदलला. आपण पक्षाचा शिस्तबद्ध सैनिक असल्याचे पार्सेकर यांनी म्हटले आहे.

गुरुवारची बैठक ठरली महत्वपूर्ण

गेल्या काही दिवसांपासून पक्षाच्या नेत्यांनी पार्सेकर यांची मनधरणी चालविली होती. पण पार्सेकर यांनी त्याला दाद दिली नव्हती. त्यामुळे त्यांच्यावर दबावही आणला जात होता. गुरुवारी संध्याकाळी पणजीत झालेल्या बैठकीला पक्षाच्या गाभा समितीचे सदस्य असलेले केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, दत्ता खोलकर, सतिश धोंड, सदानंद शेट तानावडे, संजीव देसाई, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांचीही उपस्थिती होती. बैठकीत नेमकी कोणती चर्चा झाली हे समजू शकले नाही. मात्र या बैठकीनंतर पार्सेकर यांनी आपला पवित्रा बदलला.

मोदींना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी निर्णय

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनविण्यासाठी आपण काम करण्याचा निर्णय घेतला आहे. कुणा एका व्यक्तीसाठी आपण आपली तीस वर्षाची भाजपची निष्ठा कमी करू शकत नाही. आपण या पक्षासाठी भरपूर काम केले आहे. यापुढेही करणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.

Related posts: