|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कोलवाळ जेलमध्ये ‘पॅरोल’चा होतोय दुरुपयोग

कोलवाळ जेलमध्ये ‘पॅरोल’चा होतोय दुरुपयोग 

प्रतिनिधी/ पणजी

 अट्टल गुन्हेगार म्हणून तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना बेकायदेशीररित्या पॅरोल सुट्टी मिळवून देण्यासाठी राजकारणी धडपडत असल्याचे दिसून येत आहे. काही आमदार, मंत्र्यांकडून तुरुंग अधिकाऱयांवर दबाव आणला जातो. तुरुंग अधिकाऱयांची काही कैद्यांवर मेहरबानी असल्याने त्यांना वेळोवेळी सहज पॅरोल सुट्टी मिळत असते. पॅरोलवर गेलेले काही कैदी पुन्हा येतच नसल्याचेही उघड झाले आहे. एकाबाजूने बरेच कैदी तुरुंगात आलिशान जीवन जगत असल्याचे उगड होत आहे, तर दुसऱया बाजूने काही कैदी अर्ध्याअधिक दिवस तुरुंगाबाहेर असल्याचेही उघड झाले आहे.

प्राप्त माहितीनुसार कोलवाळ तुरुंगात सध्या अंदाधुंद कारभार सुरु असून, तुरुंगातील काही कैदी तुरंग अधिकऱयांना तसेच राजकारणी लोकांना हाताशी धरून तुरुंगातील सुविधांचा गैरवापर करीत असल्याचे दिसून येत आहे. ज्यांना जन्मठेपची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे त्यापैकी काही कैदी पॅरोलच्या नावाखाली अधिकाधिक दिवस तुरुंगाबाहेरच असतात.

तिघे कैदी परतलेच नाही

आतापर्यंत तीन कैदी जनक बहादूर, कुशल पुरी (दोघेही नेपाली) व प्रकाश नायर (केरळा) हे पॅरोल सुट्टीवर म्हणून गेले ते परत आलेच नाहीत, याला जबाबदार कोण असाही प्रश्न उपस्थित होत आहे. कोणतेही सोपस्कार पूर्ण न करताच या कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आले होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. याप्रकरणी काही कर्मचाऱयांना निलंबित करण्यात आले होते मात्र अवघ्या काही दिवसांनी त्या कर्मचाऱयांना पुन्हा नोकरीत रुजू करून घेण्यात आले आहे.

अनेक कैदी तरुंगात नव्हे, पॅरोलवरच!

निवृत्त पोलीस आधिकारी सेबस्तीयन कायरो जो सर्वोच्च न्यायालयात अब्दूल गफर कस्टोडीएल खून प्रकरणात दोषी ठरला होता त्याने एकही दिवस तुरुंगात काढलेला नसतानाही त्याला पॅरोलसुविधा मंजूर करण्यात आली होती. गेल्या 390 दिवसांपासून तो तुरुंगा बाहेरच असल्याचेही सूत्रांनी सांगितले. पोलीस हवालदार सावळो नाईक गेल्या 130 दिवसांपासून पॅरोल सुट्टीवर आहे हे कसे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मंदार सुर्लीकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी रोहन घुंगट हा गेले सात महिने तुरुंगाबाहेरच आहे. प्रत्येक दोन महिन्यानंतर रोहन घुंगट याला पुस्तक प्रकाशन, चित्रप्रदर्शन, अशा शुल्लक कारणासाठी पॅरोल सुट्टी मंजूर केली जाते. 2018 सालात शिक्षा झालेला रोहन पै व 2017 सालात शक्षा झालेला रुपेश साळगावकर हे गेल्या 180 दिवसांहून अधिक काळ तुरुंगाबाहेरच आहेत. काही कैदी बनावट आरोग्य दाखला सादर करून पॅरोलवर जात असतात तर काही कैदी आरोग्य दाखला ही देत नाही तसेच काही कैद्यांचा पोलीस रिपोर्टही न पाहाताच त्यांना पॅरोलवर सोडले जाते हे सगळे शक्य होते त्याचे मुख्य कारण म्हणजे कैदी आणि तुरुंग अधिकाऱयांची साटेलोटे आहेत.

आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया कुशल पुरी (नेपाली) याचा पोलीस रिपोर्ट न पाहताच त्याला पॅरोलवर सोडण्यात आले होते, तो अद्याप परत आलाच नाही. 2018 सालात 7 कैद्यांना चार ते पाच वेळा पॅरोलवर सोडण्यात आले होते. त्यांच्या शिक्षेपैकी अर्ध्याअधिक काळ तुरुंगाबाहेरच जात असतो. रुपेश साळगांवकर सारख्या कैद्यांना अवघ्या दहा दिवसात पॅरोल सुट्टी मंजूर होते हे कसे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Related posts: