|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिनोळी येथील युवकावर कोयत्याने हल्ला

शिनोळी येथील युवकावर कोयत्याने हल्ला 

प्रतिनिधी/ बेळगाव

आर्थिक व्यवहारातून शिनोळी (ता. चंदगड) येथील एका युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास कपिलेश्वर कॉलनी येथे ही घटना घडली असून जखमी युवकाची प्रकृती चिंताजनक आहे.

संभाजी शिवाजी मेणसे (वय 35, रा. शिनोळी) असे जखमी युवकाचे नाव आहे. त्याला खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. संभाजीवर कोयत्याने हल्ला केल्या प्रकरणी दिलीप रमेश साळुंखे (रा. कपिलेश्वर कॉलनी) याच्या विरुद्ध मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले आहे.

पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी पुढील तपास करीत आहेत. जखमी संभाजीची बहिण सुधा जोतिबा पाटील हिने या प्रकरणी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. कोयत्याने हल्ला करणारा दिलीप हा इन्शुरन्सचे काम करीत होता. संभाजीने इन्शुरन्ससाठी त्याला 60 हजार रुपये दिले होते. याबरोबरच अडीच लाख रुपये उसने दिले होते.

इन्शुरन्स तर नाहीच, घेतलेले पैसेही त्याने परत केले नव्हते. गुरुवारी रात्री संभाजी पैसे मागण्यासाठी दिलीपच्या घरी गेला असता दिलीपने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला आहे. या हल्ल्यानंतर दिलीप फरारी झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेनंतर कपिलेश्वर कॉलनी परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.

Related posts: