|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » अझहरवर बंदीचे प्रयत्न सुरूच

अझहरवर बंदीचे प्रयत्न सुरूच 

अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन निर्णायक भूमिकेत : चीनसोबत उच्चस्तरीय चर्चा

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन 

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहरचा जागतिक दहशतवाद्यांच्या यादीत समावेश करण्याचे प्रयत्न अद्याप संपुष्टात आलेले नाहीत. मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करविण्यासाठी भारताने चहुबाजूने दबाव वाढविला आहे. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने मसूदचा बचाव करणाऱया चीनच्या विरोधात कठोर भूमिका घेतली आहे. चीनने प्रस्तावावर नकाराधिकार वापरल्याबद्दल भारताने निराशा व्यक्त केली. तर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने याप्रकरणी चीनसोबत चर्चा चालविली आहे.

मसूदला जागतिक दहशतवादी घोषित न करण्यात आल्यास हे तिन्ही देश संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वात शक्तिशाली शाखेत (सर्वसाधारण सभा) या मुद्यावर खुल्या चर्चेचा प्रस्ताव मांडणार आहे. हा मुद्दा विचारात घेत तिन्ही देश मागील 50 तासांपासून चीनसोबत ‘सकारात्मक चर्चा’ करत आहेत. अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन हे तिन्ही देश मसूदला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावाच्या मसुद्यावर चीनसोबत बोलणी करत असल्याचे समजते. तर संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीसोबत भारत काम करत आहे.

अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यासंबंधी सुरक्षा परिषदेच्या निर्बंध समितीत सादर प्रस्तावावर चीनने नकाराधिकार वापरला होता. हा प्रस्ताव अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटनने मांडला होता.

 प्रस्तावाच्या मसुद्यावर विचार

अझहरला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या समितीकडून जागतिक दहशतवादी घोषित केले जाण्याची शक्यता वाढली आहे. परंतु त्याच्या विरोधातील कारवाईवेळी चीनला स्वीकारार्ह असेल असा प्रस्ताव मांडला जाणार आहे. चीनने अझहरला दहशतवादी घोषित करण्याच्या प्रस्तावांमध्ये काही बदल करण्याची सूचना केली आहे. अमेरिका, ब्रिटन तसेच फ्रान्स या सूचनेवर विचार करत आहेत. प्रस्तावाच्या मूळ उद्देशाला धक्का बसत नसल्यास चीनची विनंती मान्य केली जाणार आहे. परंतु अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटन तसेच अन्य सदस्य अधिक काळ प्रतीक्षा करण्यास इच्छुक नाहीत.

काही दिवसांमध्येच निर्णय

अन्य पर्यायांवर गांभीर्याने विचार करत असल्याचे चीनने संबंधित देशांना कळविले आहे. काही आठवडय़ांमध्येच निर्णय घेतला जाईल असे चीनने कळविले आहे. चीन पूर्वीच्या तुलनेत यंदा अधिक सहकार्य करत असल्याचे संबंधित देशांच्या अधिकाऱयांचे मानणे आहे. या प्रस्तावावर चीनचे सहकार्य मिळणे मोठे यश  मानले जाणार आहे.

 

…तर करणार खुली चर्चा

नव्या प्रयत्नांनंतरही अझहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्यास अपयश आल्यास तिन्ही देश या मुद्यावर खुल्या चर्चेसाठी संयुक्त राष्ट्रसंघ महासभेत प्रस्ताव मांडण्याची योजना तयार करत आहेत. सुरक्षा परिषदेच्या समितीच्या अंतर्गत चर्चा सर्वसामान्यपणे गोपनीय ठेवल्या जातात, परंतु यंदा दहशतवाद्याची चीनने पाठराखण केल्याने परिषदेच्या अनेक सदस्यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. प्रस्तावाचे मूळ पुरस्कर्ते मागील 50 तासांपासून चीनसोबत चर्चा करत आहे, तर जाणकारांनी या चर्चेला ‘तडजोडीचा करार’ ठरविले आहे.

Related posts: