|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » निवडणुकीतील प्रचार साहित्य

निवडणुकीतील प्रचार साहित्य 

निवडणुकीची लगबग सुरू झाली की प्रचार साहित्याची खरेदी आणि वितरणाच्या कामाला खूपच वेग येतो. दर निवडणुकीच्या वेळी विविध राजकीय पक्ष आणि त्यांचे उमेदवार प्रचार साहित्यामध्ये विविधता आणून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात.

दिल्लीत, विशेषतः लोकसभेच्या निवडणूकप्रसंगी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची निवडणुकीचे तिकीट पक्षातर्फे आपल्यालाच मिळावे यासाठी, आपल्याला डावलून पक्षांतर्गत आपल्या प्रतिस्पर्ध्याला वा प्रसंगी आपल्या विरोधकाला तिकीट न मिळण्यासाठी, प्रचार साहित्य खरेदी करण्यासाठी व निवडून आलेल्या खासदाराचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाल्यास त्यांच्या शपथविधी प्रसंगी विशेष गर्दी होत असते. उमेदवार समर्थनासाठी गर्दी करणाऱयांमध्ये जे राजकीय धुरीण-दर्दी असतात त्यांची प्रचार साहित्याची पहिली पसंती म्हणजे नवी दिल्लीच्या सदर बाजार परिसरातील जैन यांचे दुकान. विविधतापूर्ण प्रचार साहित्याशिवाय कुठलाही पक्षभेद न करता सर्वच प्रमुख राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी लागणाऱया बिल्ल्यांपासून बॅनरपर्यंतचे सर्वप्रकारचे याठिकाणी सहजगत्या व खात्रीशीर स्वरूपात उपलब्ध असते. हा व्यवसाय करणारे 75 वषीय ओ. पी. जैन गेली अनेक दशके हे काम इमाने इतबारे करीत आहेत. त्यामुळेच उमेदवारी निश्चित झाल्यापासून निवडणूक प्रचार संपेपर्यंत जैन यांच्या दुकानात सदोदित गर्दी असतेच असते. निवडणूकविषयक प्रचार साहित्य विक्रीविषयी दिल्लीच्या सदर बाजार टेडर्स असोसिएशनचे अध्यक्ष मनोहरलाल कुमार यांच्या मते त्यांच्या संघटनेचे सदस्य दुकानदार अगदी 10 रु.पासून 10 लाखपर्यंत निवडणूक प्रचार साहित्याचा पुरवठा करण्याचे काम प्रसंगी टेलिफोनवर सुद्धा घेतात व त्यानुरूप प्रचार साहित्याच्या पुरवठय़ापासून पैशाच्या वसुलीपर्यंतचे सारे विश्वास परस्पर विश्वासावर होतात. या संदर्भात फसवणुकीचे प्रकार झालेले नाहीत हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे. निवडणूक प्रचार साहित्य खरेदीसाठी देशाच्या विविध भागातून उमेदवार व कार्यकर्ते प्रचार कालावधीत येऊन आपापल्या गरजा व ऐपतीनुसार खरेदी करतात. यामध्ये विविध राजकीय पक्ष-उमेदवारांच्या निवडणूक प्रचार साहित्याशिवाय अर्थातच राजधानी दिल्लीतील ग्राहकांचा मोठा भरणा असतो. याशिवाय अनेक राज्यामधील उमेदवारपण सदर बाजार परिसरातूनच आपल्या साहित्य खरेदीला प्राधान्य देतात. मात्र गेल्या लोकसभा निवडणूक प्रचारासाठी बिहार, बंगाल, मिझोरम यासारख्या ठिकाणच्या उमेदवारांनी दिल्लीच्या सदर बाजार परिसरातून खरेदी केली होती हे उल्लेखनीय आहे.

                                -द. वा. आंबुलकर

Related posts: