|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही : प्रियंका गांधी

चौकीदार श्रीमंतांचे असतात गरिबांचे नाही : प्रियंका गांधी 

ऑनलाईन टीम / प्रयागराज :

राहुल गांधी यांनी नवीन राजकारणाची सुरुवात करण्यासाठी मला उत्तर प्रदेशात पाठवले आहे. चौकीदार हे गरिब शेतकऱ्यांचे नव्हे तर श्रीमंत लोकांचे असतात. देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नाही असे सांगत प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले. पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि भाजपच्या मंत्र्यांनी रविवारपासून ट्विटरवर स्वतःच्या नावापुढे चौकीदार या शब्दाचा उल्लेख केला आहे. त्यावर प्रियंका गांधी यांनी भाष्य केले.

यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचं योग्य मोल मिळत नाही. गेल्या 5 वर्षात देशात बेरोजगारी वाढली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसला मतदान करा असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले. मायावती यांनी केलेल्या टीकेवरही प्रियंका गांधी यांनी प्रत्युत्तर दिले. आम्ही कोणत्याही भ्रमात नाही,आमची लढाई भारतीय जनता पार्टीविरोधत आहे असे प्रियंका गांधींनी मायावतींना सांगितले. यावेळी प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आज देशाचे संविधन संकटात आहे. अनेक वर्ष मी घरात होते. मात्र आता देश संकटात आहे त्यामुळे मला घराबाहेर पडावे लागले अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी भारतीय जनता पार्टीवर केली. प्रयागराज ते वाराणसी सुरु केलेल्या गंगा यात्रेदरम्यान त्या लोकांशी संवाद साधत होत्या. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कोणीही समोर येत नाही मात्र स्वतःच्या उद्योगपती मित्रांसाठी हजारो-करोडो रुपये दिले जातात. दिवसेंदिवस बेरोजगारी देशात वाढत आहे असा आरोपही प्रियंका गांधी यांनी केंद्र सरकारवर केला.