|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » त्रिंबक तलाठी लाच घेतांना जाळय़ात

त्रिंबक तलाठी लाच घेतांना जाळय़ात 

झाडांची नोंद करण्यासाठी मागितले पाच हजार

वार्ताहर / आचरा:

  सातबारावर झाडांची नोंद करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्रिंबक तलाठी भरत दत्ताराम नेरकर (31, रा. कुडाळ) याला सिंधुदुर्गच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून अटक केली.

 तक्रारदार यांनी त्यांचे व्यवसायिक मित्र यांच्याकडून झाडे विकत घेतली होती. त्या झाडांची नोंद 7/12 वर नसल्याने ती नोंद घालण्यासाठी तलाठी नेरकर याने पाच हजार रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारीनुसार पडताळणी करण्यात आली. तलाठी नेरकर लाच मागत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सापळा लावण्यात आला होता. तलाठी नेरकर याने लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारल्यावर त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. तसेच पाच हजार रुपये घटनास्थळी हस्तगत करण्यात आले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक दीपक दळवी व पोलीस निरीक्षक मितीश केणी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जनार्दन रेवंडकर, पोलीस नाईक नीलेश परब, पोलीस कॉन्स्टेबल खंडे, पोतनीस या पथकाने केली. नेरकर याला मंगळवारी ओरोस न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

तलाठय़ाकडे चौकशी सुरू

  लाच घेताना पकडण्यात आलेल्या तलाठय़ाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चौकशीसाठी आचरा पोलीस ठाण्यात आणले होते. त्या ठिकाणी चौकशीनंतर त्याला आपल्या ताब्यात घेऊन कुडाळ येथील मुख्यालयात घेऊन गेले. त्रिंबक तलाठय़ाला लाच घेताना पकडण्यात आल्याची माहिती समजताच महसूल विभागात एकच खळबळ उडाली होती.