|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सहावीतील मुलीची आत्महत्या

सहावीतील मुलीची आत्महत्या 

आचऱयातील घटना : शिर्के कुटुंबावर दु:खाचा डोंगर

वार्ताहर / आचरा:

आचरा पारवाडी येथील हेमांगी मंदार शिर्के (11) या इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सहावीत शिकणाऱया विद्यार्थिनीने घरातील खोलीत लाकडी बाराला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवारी सायंकाळी घडली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

हेमांगी हिचा मृतदेह रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घरातील खोलीत आडव्या लाकडी बाराला नायलॉन दोरीने गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबत तिचे चुलत काका किशोर दत्ताराम शिर्के यांनी आचरा पोलीस ठाण्यात खबर दिली.

अभ्यास आणि सांस्कृतिक कार्यक्रमात नेहमी अग्रेसर असणारी हेमांगी आचरा पारवाडी येथील सामाईक घरात आजोबा, आई, भावंडांसह राहत होती. तिचे वडील कामानिमित्त परदेशात दुबईत असतात. याबाबत किशोर शिर्के यांनी आचरा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीनुसार, रविवारी शाळेला सुट्टी असल्याने हेमांगी घरीच होती. तिने सकाळी सायकल चालविली. तसेच आईसोबत शेतात पाणी लावून दुपारी जेवणही केले होते. सायंकाळी 6.15 वाजण्याच्या सुमारास छोटय़ा मुलाला कार्टुन लावण्यासाठी म्हणून टीव्ही सुरू करणाऱयास गेलेल्या तिच्या आईने हेमांगीला गळफास लावलेल्या स्थितीत बघून आरडाओरड केली. घटनेची माहिती मिळताच आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्यासह हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण, व्ही. व्ही. केकरे, अक्षय धेंडे, आर. बी. शेवडे, महिला पोलीस कदम, पोलीस पाटील विठ्ठल धुरी आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

हेमांगीचे वडील परदेशात असल्याने ते आल्यानंतर मंगळवारी आचरा पारवाडीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. हेमांगीच्या पश्चात आई, वडील, बहीण, भाऊ, आजोबा, काका असा परिवार आहे. हेमांगीच्या अचानक जाण्याने शिर्के परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल सुनील चव्हाण करत आहेत.

स्कूल मेंटल हेल्थ प्रोग्रॅम तीव्रतेने राबवा-डॉ. पाटकर

दरम्यान, या घटनेबाबत जिल्हा रुग्णालयाचे मानसोपचातज्ञ डॉ. रुपेश पाटकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, स्कूल मेंटल हेल्थ प्रोग्रॅम अधिक तीव्रतेने राबविण्याची गरज यानिमित्त अधोरेखित झाली आहे. त्यासाठी पालक, शिक्षक, विद्यार्थी यांना समस्या निवारण, निर्णय क्षमता आणि आत्मविश्वास यासंबंधी प्रशिक्षण देण्याची गरज आहे. 

आचरा आरोग्य केंद्रात शीतपेटीची गरज

 आचरा परिसरात रात्रीच्या वेळेस एखादी घटना घडल्यानंतर शवविच्छेदन करेपर्यंत शव शीतपेटीत ठेवण्यासाठी अडचणी येत असून यासाठी मालवण किंवा कणकवली गाठावे लागत आहे. याचा नातेवाईक, ग्रामस्थ यांना त्रास सहन करावा लागत आहे. आचरा केंद्रात शीतपेटीची सोय करण्याची मागणी आचरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून जोर धरू लागली आहे.