|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » रेल्वेकडून ‘पीएनआर’ नियमात 1 एप्रिलपासून बदल

रेल्वेकडून ‘पीएनआर’ नियमात 1 एप्रिलपासून बदल 

संयुक्त पीएनआरची योजना : नव्या नियमानुसार परताव्यासाठी होणार अंमलबजावणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

रेल्वेच्या प्रवाशांना काही नव्या सुविधांचा लाभ एप्रिलपासून मिळणारा आहे. त्यासाठी भारतीय रेल्वेकडून नव्याने संयुक्त ‘पीएनआर’ (पॅसेंजर नेम रेकॉर्ड) उपलब्ध करण्यात येणार आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक गाडय़ांतून प्रवास करणाऱया प्रवाशांना संयुक्त ‘पीएनआर’ मिळणार आहे. यात जर पहिल्या गाडीला उशीर झाल्याने दुसरी गाडी सुटली तर याचा कोणताही भुर्दंड प्रवाशाला न बसता प्रवास रद्द करता येणार आहे.

कोणत्याही प्रवास करण्यासाठी दोन रेल्वेगाडय़ांची तिकिटे बुक केल्यास संबंधित प्रवाशाच्या तिकिटावर दोन स्वतंत्र पीएनआर असतात. या पीएनआर क्रमांकाद्वारे गाडी, तिकिटाची स्थिती आणि प्रवासाची माहिती समजते. पण 1 एप्रिलपासून नव्या नियमाची अंमलबजावणी झाल्यानंतर दोन्ही पीएनआर संयुक्त करण्यात येणार आहेत. या नव्या नियमांमुळे पूर्वीच्या तुलनेत रद्द तिकिटाचा परतावा पूर्वीपेक्षा जास्त लवकर मिळणार आहे.

तिकिट परताव्याच्या अटी

नव्या नियमांच्या अंतर्गत संयुक्त पीएनआर असणारी तिकिटे रद्द झाल्यानंतर मिळणाऱया परताव्यासाठी काही नियमांची अंमलबजावणी होणार आहे. या सर्वात महत्वाचे म्हणजे दोन्ही तिकिटांवर प्रवाशाची माहिती एकसारखीच असणे आवश्यक आहे. पहिली गाडी पोहोचण्याचे आणि दुसऱया गाडीचा प्रवास संपण्याचे स्टेशन एकच असले पाहिजे. तिकीट ऑनलाइन किंवा ऑफलाइन काढलेले असेल तरीही या सुविधेचा लाभ मिळणार आहे. तसेच हा नियम सर्वच दर्जासाठी लागू आहे.

परताव्यासाठी हे करावे लागणार…

रेल्वे स्टेशनवरून परतावा मिळाला नसेल तर संबंधित प्रवासी टीडीआर दाखल करू शकतो. यासाठी वैधता 3 महिने असेल. जर रेल्वे कॉन्टरवरून तिकीट घेतले असल्यास पहिली गाडी येण्याच्या तीन तास अगोदर दुसऱया गाडीचे तिकीट रद्द केले जाऊ शकते. परताव्याची रक्कमही यावेळी कॉन्टरवरून घेतली जाऊ शकते. ज्या स्टेशनवर गाडी अगोदर पोहोचते आणि तेथून दुसरी गाडी पकडायची आहे, त्याच स्टेशनवर टीडीआर दाखल करावा लागणार आहे. तिकीट रद्द झाल्यानंतर तेव्हाच पूर्ण परतावा मिळेल, ज्यावेळी पहिल्या गाडीला उशीर होऊन दुसरीही गाडी मिळणार नाही.