|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपाच्या वाटेवर ?,आज होणार फैसला

रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपाच्या वाटेवर ?,आज होणार फैसला 

ऑनलाईन टीम /  सोलापूर : 

 राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांच्या दोन याद्या जाहीर केल्या असल्या तरी माढा मतदारसंघाचा पेच कायम आहे. माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी व भाजपाचे उमेदवार कोण?, अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. आज अकलूजमध्ये मोहिते-पाटील समर्थकांची बैठक होणार आहे, त्या बैठकीनंतरच रणजितसिंह मोहिते-पाटील पुढची दिशा ठरवणार आहेत. रणजितसिंह मोहिते-पाटील भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे.
 गेल्या काही दिवसांपूर्वी रणजितसिंह मोहिते-पाटलांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचीही भेट घेतली होती. त्यावेळीही ते भाजपात प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. विशेष म्हणजे माढा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्या उमेदवारीलाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा कंदील दाखवला आहे. जिल्ह्यातील महाआघाडीचे नेते आमदार प्रशांत परिचारक, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत आदी नेत्यांना याबाबतची माहिती दिली आहे. बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी मुंबईत बोलावून घेतले होते. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांना माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याबाबत विचारणा करण्यात आली होती. पण त्यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातच रस असल्याचे सांगितले. त्यामुळे भाजपाकडून रणजितसिंह मोहिते-पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. लवकरच त्यांचा भाजपा प्रवेश होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी राजेंद्र राऊत यांना सांगितले. ही बाब संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील इतर नेत्यांच्या कानावर घातल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्यावर राऊत म्हणाले, आमची काही अडचण नाही. आम्ही आमच्या पद्धतीने त्यांना निवडणुकीसाठी मदत करू, पण मोहिते-पाटलांनी उद्या बार्शी तालुक्यात येऊन आम्हाला त्रास देऊ नये, याची काळजी तुम्हीही घेतली पाहिजे, असे राऊत यांनी सांगितले. 
राष्ट्रवादीचे विद्यमान खा. विजयसिंह मोहिते-पाटील यांचे चिरंजीव माजी खा. रणजितसिंह मोहिते-पाटील हे कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविणार असल्याचे निश्चित मानले जात आहे. परंतु राष्ट्रवादीतील काही ज्येष्ठांचा त्यांना विरोध आहे. राष्ट्रवादीकडून विजयसिंह मोहिते-पाटील निवडणूक लढवावी, अशीही काहींची इच्छा आहे. पण जर पार्थ पवारांना उमेदवारी मिळू शकते, मग रणजितसिंह मोहिते-पाटलांना का नाही, असा प्रश्नही आता माढ्यातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांतून विचारला जातो.