|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » आगे आगे देखो होता है क्या…दिग्गजांच्या भाजपा प्रवेशावर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान

आगे आगे देखो होता है क्या…दिग्गजांच्या भाजपा प्रवेशावर मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लोकसभा निवडणुकीत रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकण्याचा दावा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षातले दिग्गज नेते भाजपात येणार असल्याचे सुतोवाच करत ‘आगे आगे देखो होता है क्मया’ असा इशारा दिला आहे. तसेच आज किंवा उद्या भाजपाच्या उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचे सांगितले आहे.

प्रदेश कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील एकूण लोकसभेच्या जागांपैकी रेकॉर्ड ब्रेक जागा जिंकण्याचा दावा केला. तसेच विरोधी पक्षांचे अनेक दिग्गज नेते भाजपच्या वाटेवर असून वाट पाहण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यावर शरद पवार काय बोलले मला माहिती नाही, पण त्यांनीच विपर्यास केल्याचेही म्हटले आहे. यामुळे एकूणच ते संभ्रम स्थितीमध्ये असल्याचे दिसत असल्याचा आरोप त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केला. तसेच हवाई हल्ला झाल्याचे मान्य केले तर त्याचे श्रेय मोदींना जाईल याचीही त्यांना भीती असल्याचे फडणवीस म्हणाले. लोकसभेसाठी शिवसेनेसोबत युती करताना आरपीआयचे रामदास आठवलेंच्या पक्षाला विचारात घेतले नसल्यावरूनही फडणवीस यांनी खुलासा केला. ते म्हणाले, रामदास आठवले यांच्या पक्षाला लोकसभेत जागा दिली जाणार नाही. पण विधानसभेत त्यांचे व्यवस्थित समाधान करणार आहे. राष्ट्रवादीचे माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते हे उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. उद्या मंत्रालयासमोरील महिला सभागृहात रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे. मात्र, रणजितसिंह मोहिते पाटील यांना भाजपने उमेदवारी देण्याचे आश्वासन दिलेले नसल्याचे समजत आहे.