|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वेळेचे महत्त्व जाणूया…

वेळेचे महत्त्व जाणूया… 

परगावाहून परतताना बसची वाट पहात एस.टी. स्टॅण्डवर बसले होते. माझ्या शेजारीच तिघीजणी बसल्या होत्या. सातत्याने त्यांचे लक्ष घडय़ाळाकडे होते. बहुदा कुणाची तरी वाट पहात असाव्यात हा विचार मनात येतो न येतो तोवर त्यांच्यामधल्या एका स्त्रीने बोलायला सुरुवात केली.

किती उशीर नेहाला, वेळेचं काही भान आहे की नाही? मीनू. तू बोलून काही होणारेय का? गेल्यावेळी आठवतंय ना, बस सुटायला जेमतेम काही सेकंद होते आणि बाईसाहेब धावत धापा टाकत पोहोचल्या.

मीनू-अगं हो, पण एक दिवस लवकर आवरता येत नाही का? याची चर्चा, त्याची चर्चा… कॉलनीतल्यांसोबत चकाटय़ा पिटत बसायचं आणि मग कामच कशी आवरत नाहीत, वेळच पुरत नाही याचं गाऱहाणं लावायचं. बरं त्यावरच थांबत नाही. कुणी दुसऱयाने यश मिळवलं तर ‘जेलसी’ बघा, तिने कशी प्रगती केली, कुठेतरी वशिला असणार… आमचं नशीबच कसं फुटकं हे पालुपद लावायचं. बुद्धी असूनही वायफळ चर्चा आणि आळस यामध्ये ती वाया जाते याचं वाईट वाटतं. मी यावेळी स्पष्टच बोलणारेय तिच्याजवळ. तिला राग आता तरी चालेल. एवढय़ातच ‘नेहा’ धावतच तिथे पोहोचली, ए… बस गेली नाही ना गं?

मीनू- तेवढी तरी चिंता आहे म्हणायची. संपल्या का तुझ्या सो कॉल्ड गप्पा…?

नेहा- गप्पा नाही गं… एका विनोदी मालिकेचा कालचा एपिसोड चुकला होता. तो पहात बसले आणि वेळ कसा गेला कळलंच नाही.

सगळय़ा- कठीण आहे, अगं काय हे?

नेहा- असू दे… बस गेली नाही ना.. मग झालं तर, विनोदी मालिका आवडतात मला. काय भन्नाट ‘टायमिंग’ आहे त्यांचं. त्या ‘टायमिंग’मुळे धम्माल येते.

तेवढय़ातच त्यांची बस आली. त्यामुळे तो संवाद तिथेच थांबला. मला ते सारं ऐकून एक क्षणभर वाटलं की, नेहाला विनोद, त्यातलं टायमिंगचं महत्त्व, ते सांभाळल्यामुळे वा साधल्यामुळे येणारी रंगत हे सारं उमजत होतं. तसंच जर जीवनामध्ये असलेल्या ‘टाईम’चं महत्त्व ओळखता आलं असतं तर ती अनेक गोष्टी साध्य करू शकली असती.

वरच्या उदाहरणासारखी अनेक उदाहरणं आपल्या अवती भवती सर्रास पहायला मिळतात. ‘आपल्याला वेळच कसा नाही याची चर्चा करत तास न् तास घालवणारेही अनेक असतात. तर काही जणांना अमुक एक व्यक्ती कशी ठीक नाही याची चर्चा करण्यात धन्यता वाटते, वेगवेगळय़ा पद्धतीनं ‘दुसऱयांना वेडा ठरवताना आपलं शहाणपण वाया घालवणारी’ अनेक माणसं असतात.

खरंतर आयुष्यामध्ये ‘वेळ’ ही गोष्ट फार मोलाची आहे. अनेक द्रष्टय़ा माणसांनी त्याचं मोल केव्हाच ओळखलंय. ‘फुका वेळ दवडू नका’ असं तुकाराम महाराज बजावतात तर संत कबीर म्हणतात, ‘कल करे सो आज कर, आज करे सो अब! पल मे परलय होगी बहुरि करेगा कब? वेळेचे महत्त्व पटवून देणारी अशी अनेक वचने सापडतील. ‘काळ’ हा मानवी जीवनातील न दिसणारा पण सर्रकन पुढे सरकणारा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. वेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन नीट केलं तर यशाचा टप्पा गाठताना कमी समस्यांचा सामना करावा लागतो परंतु त्यामध्ये चालढकल केली गेली तर मात्र अनेक गोष्टी कोलमडतात. आजच्या गतिमान जीवनशैलीमध्ये तर वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रत्येकाजवळ दिवसाचे 24 तास म्हणजे 86,400 सेकंद असतात. त्याचा उपयोग कसा करायचा, कशासाठी किती वेळ द्यायचा याबाबत सजग राहणे गरजेचे आहे.

आपल्या वेळेची विभागणी मुख्यत्वेकरून तीन भागात होते. कार्यालयीन वेळ अर्थात डय़ूटी अवर्स. यामध्ये ऑफिससाठी द्याव्या लागणाऱया वेळेचा अंतर्भाव असतो. दुसरा भाग म्हणजे मेंटेनन्स टाईम म्हणजे स्वतःच्या तसेच घराच्या देखभालीसाठी द्यावा लागणारा वेळ, जसे खाणे, झोप, स्वयंपाक, बाजारहाट, घरची साफसफाई, मुलांचा अभ्यास इ. साठी द्यावा लागणारा वेळ आणि तिसरा भाग ज्याला डिस्क्रीशनरी टाईम म्हटले जाते म्हणजेच सर्व कामे आवरून उरलेला मोकळा वेळ.

वरील तिन्ही भागांतर्गत दररोज लागणाऱया वा खर्च होणाऱया वेळेचा नीट अभ्यास केला तर काही क्लृप्त्या वापरून काही कामे एकत्रित करता येतील का? कुठचा वेळ वाचवून स्वतःसाठी मिळणाऱया मोकळय़ा वेळात काय करता येईल याचे नियोजन करता येते. वेळेच्या नियोजनासाठी आपल्याला नेमके काय करायचे आहे. याबाबत जशी स्पष्टता हवी तशीच स्वतःची लय ओळखणं ही बाबही आवश्यक आहे. प्रत्येक व्यक्तीची काम करण्याची विशिष्ट पद्धत असते. स्वतंत्र अशी लय असते. ती ओळखून काही बदल आवश्यक असल्यास ते प्रयत्नपूर्वक करून कामाची पद्धत आणि त्यासाठी लागणारा वेळ याचे कोष्टक जुळवण्याचे कौशल्य आत्मसात केल्यास अनेक कठीण वाटणाऱया गोष्टी सहज साध्य होतात.

कामाचा प्राधान्यक्रम ठरवता आला तर कशासाठी किती वेळ लागू शकतो, वेळ कसा वापरायचा, तो कुठे वाया जाऊ शकतो, तो वाचविण्यासाठी काय करता येईल याची आखणी करता येते. कामांची वर्गवारी अशी करता येऊ शकते.

1) महत्त्वाची आणि तातडीची कामे, 2) तातडीची परंतु कमी महत्त्वाची 3) महत्त्वाची परंतु निकड नसलेली कामे आणि 4) ना महत्त्वाची ना तातडीची कामे.

हे सारे करत असताना स्वतःच्या स्वभावातील उणिवांची जाणीव आणि त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न ही गोष्टही आवश्यक आहे.

वेळेचे नियोजन करणे म्हणजे स्वतःला सतत कामात गुंतवून ठेवणे नव्हे, तर उपलब्ध वेळेत आपल्याला हव्या असलेल्या सर्व गोष्टी कशा करता येतील ते ठरवणे. यामध्ये स्वतःसाठी मोकळा वेळ काढण्याचाही समावेश होतो याचेही भान आवश्यक आहे. बऱयाचदा कामांचे नीट नियोजन असेल तर वेळेचे नियोजन आपोआपच होते. काही जणांना वेळेचे भान मुळातच असते वा नसतेही. ते नसलेली अनेक माणसं आपल्या कामात स्वतःचा टाईमपास करताना व्यत्यय आणू शकतात. अशा ‘टाईम चीटर्स’ना ‘नाही’ म्हणण्याचे कौशल्यही आपल्याकडे असायला हवे.

वेळेसोबतच आपलं आयुष्यही धावत असतं. वेळेचं थोडं जरी भान ठेवलं तरी अनेक निसटू पाहणाऱया क्षणांचा आनंद आपण घेऊ शकतो. ‘टाईम मॅनेजमेंट’ अधिकाधिक कार्यक्षम, क्रियाशील बनविणारा एनर्जीचा स्रोतच आहे.

आपले शरीर हे यंत्र नाही. त्यामुळे आपल्या जीवनाचा सूर घट्ट पकडून ‘टाईम सेन्स’ राखला तर जीवनाची गाडी अधिक वेगाने यशाच्या दिशेने धावण्यास मदत होईल हे मात्र खरे!

Ad.  सुमेधा देसाई, मो.94226 11583