|Monday, June 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » घातपात गुन्हय़ांच्या तपासात अपयश

घातपात गुन्हय़ांच्या तपासात अपयश 

सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ात यापूर्वी अनेक संशयास्पद मृत्यूच्या घटना घडल्या आहेत. याबाबत गांभीर्याने तपास करून संशयास्पद मृत्यूंमागील सत्य उजेडात आलेले नाही. म्हणूनच अशा घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांनी अशा घटनांचा पर्दाफाश केला असता, तर निश्चितच धाक निर्माण होऊन अशा घटना वारंवार घडल्या नसत्या.

अलीकडील काळात कोकणात संशयास्पद मृत्यूच्या घटना वाढू लागल्या आहेत. आणि घातपात झाल्याचे आरोपही वारंवार होत आहेत. पोलीस यंत्रणेला मात्र संशयास्पद मृत्यूंचे गूढ उकलण्यात यश आलेले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच संशयाची सुई फिरू लागली आहे.

सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी या दोन्ही जिल्हय़ात यापूर्वी अनेक संशयास्पद मृत्यूच्या घटना घडल्या आहेत आणि त्याचा आजपर्यंत उलगडा झालेला नाही. दोडामार्ग तालुक्यात गाजलेले झरेबांबर तिहेरी हत्याकांड असेल किंवा कणकवलीमधील अंकुश राणे खून प्रकरण असेल. अशा अनेक संशयास्पद मृत्यूंचे गूढ उकलण्यासाठी खोलवर तपास झालेला नाही. काही खून प्रकरणांचा तपास सीआयडीकडे देण्यात आला, तरी देखील खुनांची पाळेमुळे शोधण्यास पोलिसांना यश आलेले नाही. संशयास्पद मृत्यूंच्या घटनांबाबत गांभीर्याने तपास करून संशयास्पद मृत्यूंमागील सत्य उजेडात आलेले नाही. म्हणूनच अशा घटना वाढू लागल्या आहेत. पोलिसांनी अशा घटनांचा पर्दाफाश केला असता तर निश्चितच धाक निर्माण होऊन अशा घटना वारंवार घडल्या नसत्या.

अलीकडील ताज्या घटनांचा विचार केला तर देवगड तालुक्यातील पोंभुर्ले येथील अंकिता पवार या युवतीचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. जंगलमय भागात तिचा मृतदेह आढळल्यानंतर वन्य प्राण्यांनी तिच्यावर प्राणघातक हल्ला केला असावा, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला होता. परंतु, वनखाते आणि शवविच्छेदनाच्या अहवालानुसार अंकिता पवार हिच्यावर वन्यप्राण्याने हल्ला केलेला नाही, हे स्पष्ट होताच पोलिसांच्या तपासाचे पितळ उघडे पडले. या घटनेत काही संशयितांची नावेही देण्यात आली. परंतु, दीड महिना झाला, तरी पोलीस तपासाची चक्रे गतीने फिरली नाहीत.

वेंगुर्ले तालुक्यातील म्हापण येथील श्रीकृष्ण रमाकांत रावले या तरुणाचा दीड महिन्यापूर्वी संशयास्पद मृत्यू झाला आहे. माड बागायतीच्या विहिरीत त्यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळला होता. याबाबत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवत घातपाताचा संशय व्यक्त केला. एवढय़ावरच न थांबता स्थानिक पोलिसांकडून तपासात चालढकलपणा होत असल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी आंदोलन केले. त्यानंतर याचा तपास स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडे सोपविण्यात आला आहे. आता तरी सखोल तपास होईल का आणि न्याय मिळेल का, या प्रतीक्षेत ग्रामस्थ आहेत.

देवगड तालुक्यातील वागमळा येथील महेश चंद्रकांत चव्हाण यांचाही संशयास्पद मृत्यू होऊन महिना झाला, तरी तपास होऊ शकलेला नाही. महेश चव्हाण यांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशीच घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कुटुंबीयांनी काही संशयास्पद व्यक्तींची नावेही दिली होती. तरीदेखील तपासात गती आली नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावरच संशयाची सुई फिरू लागल्याने महेश चव्हाण मृत्यूप्रकरणी नाभिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून आठ दिवसात तपास न झाल्यास नाभिक संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा देण्यात आला आहे. जनतेच्या भावना किती तीव्र आहेत, हे या आंदोलनाच्या पवित्र्यातून लक्षात येते.

 अशा प्रकारच्या अनेक ताज्या घटना आहेतच. त्याशिवाय काही महिन्यांपूर्वी मालवणच्या किनारपट्टीवर एका महिलेचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला होता. दोडामार्ग तालुक्यातील मणेरी येथील नदीत एका युवतीचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला होता. या घटनांचा उलगडाही होऊ शकलेला नाही. संशयास्पद मृत्यूच्या घटनांचा उलगडा व्हायलाच हवा. मग तो घातपात असो वा आकस्मिक मृत्यू. सत्य उजेडात आलेच पाहिजे. अशा गुन्हय़ांचा उलगडा न झाल्यास घातपाताचे प्रकार वाढत राहतील. गुन्हेगारांना गुन्हे करण्यास बळ मिळेल. संशयास्पद मृत्यूच्या मुळापर्यंत जाऊन खोलवर तपास करायला हवा. तपासात काही निष्पन्न होत नाही म्हणून फाईल बंद करून चालणार नाही. पोलिसांनी एक आव्हान म्हणून स्वीकारले तरच सत्य उजेडात येईल. संशयास्पद मृत्यूच्या घटनांबरोबरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांची इनोवा कार संशयास्पदरित्या जळाली. त्यानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. त्यामुळे या कार जळण्याच्या घटनेमागील सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे. तरच लोकही पोलिसांच्या तपास यंत्रणेवर विश्वास ठेवतील.

      पोलिसांचे कौतुकच…..पण

गेल्या वर्षभरात पोलिसांनी विविध प्रकारच्या इतर गुन्हय़ांच्या तपासात यश मिळवले. चोऱया, घरफोडीचे गुन्हेही उघडकीस आणले. राज्याच्या बाहेर जाऊन चोरटय़ांना जेरबंद केले. त्याबद्दल पोलीस यंत्रणेचे कौतुक आहेच. परंतु, हे गुन्हे उघडकीस आणण्यात सायबर लॅबची मदत होत आहे, हेही तेवढेच खरे आहे. चोरटय़ांच्या मोबाईल लोकेशनमुळे त्यांना पकडणे सोपे झाले आहे. तरीही पोलिसांचे कौतुक आहेच. परंतु, पोलिसांनी संशयास्पद मृत्यू किंवा इतर गुन्हय़ात धागेदोरे नसतानाही आपले कौशल्य पणाला लावून तपास केला आणि आपली कार्यक्षमता व कर्तव्यदक्षता सिद्ध केली, तर पोलीस यंत्रणेचे अधिक कौतुक करता येईल.

संदीप गावडे