|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » अवयवदान ही आपली परंपरा

अवयवदान ही आपली परंपरा 

इंद्राने आपल्या वज्राने वृत्रासुराचे पोट फाडले आणि पोटातून बाहेर पडून अत्यंत वेगाने पर्वतशिखराप्रमाणे उंच असलेले त्याचे डोके उडविले. सूर्यादी ग्रहांना उत्तरायण-दक्षिणायनांत स्वतःची गती पूर्ण करण्यास जेवढा वेळ लागतो, तितके दिवस म्हणजे एक वर्षभर, वृत्रासुराच्या वधाचा योग येईपर्यंत फिरत राहात त्या तीव्र वेगवान वज्राने त्याची मान सर्व बाजूंनी कापून जमिनीवर टाकली.

त्यावेळी आकाशात दुंदुभी वाजू लागल्या. महर्षींच्या बरोबरीने गंधर्व, सिद्ध इत्यादी वृत्रासुराचा वध करणाऱया इंद्राचा पराक्रम सूचित करणाऱया मंत्रांनी त्याची स्तुती करून आनंदाने त्याच्यावर पुष्पवर्षाव करू लागले. ते शत्रुदमन परीक्षिता, त्यावेळी वृत्रासुराच्या शरीरातून त्याची आत्मज्योत बाहेर पडून इंद्रादी सर्वजण पहात असतानाच सर्व लोकातीत भगवंतांच्या स्वरूपात विलीन झाली.

इंद्र वृत्रासुराचा वध करू शकला ते केवळ महषी दधीचींनी केलेल्या आत्मयज्ञामुळे. महषी दधीचींनी देहत्याग करून आपली हाडे देवतांना दिली आणि त्या हाडांचे वज्र बनवून इंद्राने वृत्रासुरावर विजय मिळवला. दधीची ऋषींचा हा परकल्याणासाठी केलेला देहत्याग अत्यंत प्रेरणादायी आहे. महषी दधीचींनी जिवंत असतानाच आपला देह दान केला. पण आपण मृत्यू नंतरही देहदान, अवयव दान तसेच नेत्रदान  करायला तयार नसतो, याला काय म्हणावे?

आपली सांस्कृतिक परंपरा याबाबत काय सांगते?

ध्यानं परं कृतयुगे त्रेतयां ज्ञानमुच्यते ।

दवापरे यज्ञमेवाहू: दानमेव कलौयुगे ।

कृत युगात ध्यान, त्रेता युगात ज्ञान, द्वापार युगात यज्ञ आणि कलयुगात दान हे साधन असल्याचा उल्लेख कुर्म पुराणात आढळतो. कलयुगात दानाला महत्त्व दिले असल्याने भूदान, गोदान, संपत्तीचे दान, अन्नदान, वस्त्रदान या स्वरूपाचे दान केल्याचे आढळून येते. पौराणिक कथांमध्ये दधिची ऋषींनी वृत्रासुराला मारण्यासाठी आपल्या अस्थींचे इंद्राला दान दिले होते, शिबी राजाने कबुतराचे प्राण वाचविण्यासाठी आपल्या अंगावरचे मांस दान दिले, ब्राह्मणपुत्राला वाचविण्यासाठी राजा मयूरध्वज आपले अर्धे अंग द्यायला तयार झाला तर कर्णाने जन्मत:च शरीराचा एक भाग म्हणून लाभलेले कवच कुंडल दान केले. अशा पौराणिक कथा ऐकल्यानंतर वाटते की, पुराण काळापासूनच भारतीय संस्कृतीत अवयव दानाची संकल्पना रूढ आहे.

आज अवयव दानाविषयी सर्व स्तरावर जनजागृती करणे आवश्यक झाले आहे. अवयव दान व देह दान या दोन्हीमध्ये फरक आहे. अवयव दान हे जिवंतपणी व मरणानंतरही करता येते. अवयव दान करताना शरीरातील ठरावीक अवयवच दान केले जातात. परंतु देहदान हे फक्त मरणानंतरच एखाद्या वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टरांना मानवी शरीराच्या अभ्यास, प्रात्यक्षिक व संशोधन करण्यासाठी दिले जाते. वैद्यकीय महाविद्यालयाला असा मृतदेह दान करणे हाही आधुनिक अंत्यसंस्कार समजायला हवा.