|Monday, June 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » घराणेशाहीच्या प्रेमात भाजप!

घराणेशाहीच्या प्रेमात भाजप! 

चाचा-भतिजा वादसे हमें महाराष्ट्र के राजनीती को मुक्त करना है…. अशी डरकाळी दस्तुरखुद्द नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या निवडणुकीत बारामतीत झालेल्या प्रचारसभेत फोडली होती. भाजपला त्याचा विसर पडला आहे. घराणेशाही आणि भ्रष्टाचार या मुद्यांवर भारताने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले. आता दुसऱयांदा संधी द्या म्हणून ते जनतेसमोर जात आहेत तेव्हा त्या भाषणाला विसरले आहेत. आता बारामतीच्या शिलेदारांना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावत आहेत. तसेही गेली साडेचार वर्षे राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून आलेल्या आयाराम-गयाराम मंडळींच्या जोरावरच भाजपने अनेक गड सर केले. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपली सत्ता आणून दाखवली. सुजय विखे-पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर रोज एक राजकीय घराणे काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडून भाजपमध्ये प्रवेश करत राहील अशी गर्जना महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केली. शिवाय एका मुलाखतीत तर त्यांनी शरद पवारांनी पाच दशकांच्या राजकीय कारकिर्दीत उभारलेले संस्थान यंदाच्या निवडणुकीत खालसा होईल असे भाकितही केले आहे. त्यासाठी सगळे मिळून दोन कोटी लोकांची मते मिळवून काँग्रेस-राष्ट्रवादीला गेल्या निवडणुकीत मिळालेल्या तुरळक जागाही युती हिसकावून घेईल असा विश्वास दादांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या राजकारणात ज्या घराण्याचे नाव गेली अनेक वर्षे चर्चेत आहे त्या अकलुजच्या सहकारमहर्षि शंकरराव मोहिते-पाटील यांचे नातू व युवा वारसदार रणजितसिंह मोहिते-पाटील बुधवारी भाजपात प्रवेश करतील असे आता स्पष्ट झालेले आहे. शरद पवारांचे कट्टर समर्थक खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचा हा मुलगा कधीकाळी सुप्रिया सुळे टीम आणि अजित पवार विरोधी ब्रिगेडचा सक्रीय नेता होता. पवारांनी माढातून निवडणूक लढविल्यानंतर रणजितसिंहांच्या कार्याने प्रभावित होऊन किंवा मोहिते-पाटलांना जपण्यासाठी म्हणा रणजितसिंहांना राज्यसभेवर पाठविण्यात आले. जिल्हा बँकेचे अध्यक्षपदही त्यांनी उत्तमरीतीने हाताळले. इतकेच नव्हे तर आपली छापही पाडली. असा हा युवक जेव्हा भाजपच्या हाती लागतो तेव्हा भाजपला आनंद होणे स्वाभाविकच आहे. शिवाय सोलापूर शहराचा पक्ष अशी असलेली ओळख पुसून ग्रामीण भागात हातपाय पसरायला त्यांना संधी मिळणार आहे. तसेही पूर्वी गोपीनाथ मुंडेंशी असलेल्या मैत्रीमुळे त्यांचे काका प्रतापसिंह भाजपमध्ये जाऊन राज्याचे उपाध्यक्ष बनले होते. 2004 साली काँग्रेसच्या आनंदराव देवकातेंना पराभूत करून ते भाजपचे खासदार बनले. त्याला अर्थातच विजयसिंहांची अप्रत्यक्ष साथ होती. पुढे घराण्यातील वाद विकोपाला जाऊन प्रतापसिंह दुरावले. आज त्यांचे चिरंजीव धवलसिंह शिवसेनेच्या उपजिल्हाप्रमुख पदावर आहेत. आणि चाचांचा प्रयोग संपुष्टात आलेल्या भाजपने आता भतिजा पक्षात आणण्याचे निश्चित केले आहे. भाजपला ग्रामीण सोलापूर जिल्हय़ासह पश्चिम महाराष्ट्रात वातावरण निर्मितीला हे जसे उपयुक्त ठरेल तसेच मोहिते-पाटलांच्या येण्याचा एक परिणामही मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शी प्रतिमेला धक्का पोहोचण्यात होणार आहे. सुमित्रा पतसंस्था, विजय शुगर आणि सहकारमहर्षि कारखान्यातील गैरव्यवहारांचे आरोप, पतसंस्था चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांच्यावर कर्मचाऱयाच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा खटला अशा बाबतीत यापुढे भाजपला खुलासे करावे लागतील. शिवाय भाजपचे सहकारमंत्री सुभाष देशमुखांप्रमाणेच मोहिते पाटलांचेही विरोधक असलेली समांतर आघाडीही डोकेदुखी करेल. ही अजित पवारांची ब्रिगेड गेली चार वर्षे भाजपसोबत जिल्हा परिषदेत सत्तेत आहे. पण, मुख्यमंत्र्यांनी वारंवार आवाहन करूनही जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे भाजपात आले नाहीत. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार बबन शिंदेंचे ते बंधू आहेत. त्यांच्या पाठीशी आहेत भाजपचे राज्यमंत्री व सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख. पण, जेव्हा शरद पवारांच्या विरोधात माढय़ात लढायची तयारी सुरू झाली तेव्हा शिंदे-परिचारक मागे सरले! परिस्थिती अशी असताना चंद्रकांतदादा शरद पवारांचे पाच दशकांचे संस्थान खालसा होईल असे म्हणतात हे मोठेच धाडस म्हणायचे! दादांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्रात भाजपची घोडदौड सुरू आहे हे निश्चितच. पण, कोल्हापुरात राष्ट्रवादीच्या महाडिकांच्या पाठिंब्यावर त्यांची जिल्हा परिषद आणि महापालिकेत सत्ता आहे. सांगलीतील सत्ताही अशाच राष्ट्रवादीतून आलेल्या मंडळींमुळे आहे. आता लोकसभेला तिकीट मिळाले नाही तर तिथले खासदार संजय पाटील बंड करू शकतात. पुणे, नगरचे त्रांगडे तर अनाकलनीय आहे. सोलापूरचा आजपर्यंतचा तमाशा कमी होता, त्यात मोहिते पाटलांची एंट्री झाल्याने नवी गौळण, नवे वगनाटय़ गाजणार आहे. भाजपचा रंगमंच पश्चिम महाराष्ट्रात फुललेला दिसतो. पाटीलदादांना भावी मुख्यमंत्रीपदाच्या शुभेच्छा देण्यासही हरकत नाही. पण, चाचा-भतिजा वादाचे काय? रणजितसिंह मोहिते पाटील हा झुंझार युवक भाजपला मिळाला हे सत्य असले तरी सहकारातील संस्थानिक आ़श्रयाला का येतात? संस्थान कसे जपतात हे 1995 ते 99 च्या सत्तेत अनुभवून आणि 15 वर्षे सत्तेचा वनवास सोसूनही भाजप विसरला आहे. पवार किंवा काँग्रेसने स्वतःची माणसे घडवली तशी भाजप, शिवसेनेनेही घडवली आहेत. पण, उसनवारीच्या नादाने भाजप आपल्या केडरला दाबत चालला आहे. या पक्षातही कर्तृत्ववान माणसे आहेत, त्यांच्या संधी हुकत आहेत. वर्षानुवर्षे ज्यांच्या विरोधात लढाई केली त्यांना डोक्यावर मिरवून भाजपचे कार्यकर्ते थकले आहेत. फक्त त्यांची शिकवण त्यांना हा बुक्क्यांचा मार सोसायला भाग पाडते आहे. पुण्यात सत्तेची चव देणारे काकडे लाथाडून जातानाही सर्वशक्तिमान भाजप हतबल आहे. तरीही सत्तेची सूज नेत्यांना वाढ वाटत आहे. घराणेशाहीचा अंत यातून होतो का, आणि देश काँग्रेसमुक्त होते की भाजप काँग्रेसयुक्त होणार याचा जाब भाजप नेत्यांनी देण्याची वेळ आली आहे.