|Monday, June 24, 2019
You are here: Home » leadingnews » अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला मोठा धक्का, 2 मंत्री अन् 12 आमदारांचा NPPमध्ये प्रवेश

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाला मोठा धक्का, 2 मंत्री अन् 12 आमदारांचा NPPमध्ये प्रवेश 

ऑनलाईन टीम / इटानगर : 

 लोकसभा निवडणूक 2019ची रणधुमाळी जोरदार सुरू आहे. अनेक ठिकाणी भाजपा आणि काँग्रेसच्या नेत्यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. एकीकडे नेत्यांना पक्षबदलाचे वारे लागले असतानाच अनेक पक्षांना बंडखोरीचे  ग्रहण लागले आहे. येत्या निवडणुकीच्या पूर्वीच भाजपाला अरुणाचल प्रदेशमध्येही मोठा झटका बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरुणाचल प्रदेशमधील भाजपाचे दोन मंत्री आणि 12 आमदार मेघालयाचे मुख्यमंत्री कोनराड संगमा यांच्या नॅशनल पीपल्स पार्टी(एनपीपी)मध्ये सहभागी झाले आहेत. गृहमंत्री कुमार वाई, पर्यटन मंत्री जारकार गामलीन आणि इतर विद्यमान आमदारांना भाजपाने तिकीट देण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्यांनी एनपीपीमध्ये प्रवेश केला आहे. वाई म्हणाले, भाजपाने खोटी आश्वासने देऊन लोकांच्या मनातील पहिल्यापासून असलेला विश्वास गमावला आहे. आम्ही फक्त निवडणूक लढणार नाही, तर अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीचं सरकार बनवू. तसेच पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल(पीपीए)चा एक आमदार आणि भगवा पार्टीचे 19 नेते एनपीपीमध्ये सामील झाले आहेत. त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये एनपीपीची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे.