|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » रणजितसिंह मोहिते पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीला रामराम, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भाजपचा झेंडा

रणजितसिंह मोहिते पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीला रामराम, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती घेतला भाजपचा झेंडा 

ऑनलाईन टीम /  मुंबई :

 राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे विद्यमान खासदार विजयसिंह माेहिते यांचे पुत्र तथा राष्ट्रवादीचे सरचिटणीस रणजितसिंह मोहिते पाटील यांनी बुधवारी राष्ट्रवादीला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, गिरीश महाजन यांच्या उपस्थित मुंबईतील गरवारे क्लब येथे रणजितसिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. माढा (जि. साेलापूर) मतदारसंघातून त्यांना उमेदवारीही मिळण्याची शक्यता आहे.

मागील पाच वर्षात महाराष्‍ट्र प्रगतीपथावर असून मुख्यमंत्र्यांनी गटतट बाजुला ठेऊन विकासकामे केल्याचे रणजितसिंह पाटील यांनी यावेळी सांगितले. गरवारे क्लबमध्ये रणजितसिंह यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे.  दरम्यान, याआधी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डॉ. सुजय विखे यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता.  २०१४ च्या लाेकसभा निवडणुकीत माेदी लाट असतानाही विजयसिंह माेहितेंनी माढा मतदारसंघात पक्षाला प्रतिनिधित्व मिळवून दिले हाेते. मात्र गेल्या ५ वर्षांत पक्षाने त्यांना अडगळीत टाकले. त्यातच आताच्या लाेकसभा निवडणुकीत स्वत: पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी रिंगणात उतरण्याची घाेषणा करून माढा मतदारसंघाची निवड केली. मात्र माेहिते पाटील समर्थकांच्या प्रचंड विराेधामुळे व घराणेशाहीच्या आराेपामुळे शरद पवारांनी माघारीचा निर्णय घेतला. तरीही या मतदारसंघात माेहितेंना उमेदवारी मिळणार की नाही याबाबत शंकाच हाेती. त्यामुळे विजयसिंह यांचे पुत्र रणजित माेहिते यांनी थेट भाजपचा पर्याय निवडला. आपणही भाजपमध्ये जाणार का, या प्रश्नावर खासदार विजयसिंह म्हणाले, ‘रणजितसिंह यांची जी भूमिका आहे त्याला माझे समर्थन आहे, याचा अर्थ समजून घ्यावा.’