|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी आरपारची लढाई!

काँग्रेस उमेदवाराच्या विजयासाठी आरपारची लढाई! 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांचा निर्धार

पक्षाचे उमेदवार समजून प्रचार करणार!

सर्व समाजातील जनता पाठिंबा देईल!

प्रतिनिधी / कुडाळ:

काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर हे आमच्याच पक्षाचे उमेदवार समजून आम्ही प्रचार करणार आहोत. त्यांच्या विजयासाठी आम्ही आरपारची लढाई करायची ठरविली असून सर्व समाजातील जनता बांदिवडेकर यांना पाठिंबा देईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केला.

येथील दैवज्ञ सभागृहात आयोजित काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विकास सावंत, काँग्रेस आघाडीचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर, अमित सामंत, काका कुडाळकर, एम. के. गावडे, प्रमोद धुरी, नम्रता कुबल, बाळ कनयाळकर आदी उपस्थित होते.

गवस पुढे म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते अजित पवार व अन्य नेत्यांच्या आदेशानुसार आम्ही काँग्रेसचा प्रचार करणार आहोत. उमेदवार बांदिवडेकर हे स्वच्छ प्रतिमेचे, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ता व प्रामाणिक असल्याचे गवस यांनी सांगितले. सिंधुदुर्गातील तरुणांना रोजगार नाहीत. बेरोजगारी, महागाई वाढत आहे, याकडे लक्ष वेधून राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी-कार्यकर्ते बांदिवडेकर यांचा प्रचार करून त्यांना विजय मिळवून देतील, असे सांगितले.

सनातनचा सभासद नाही!

आपण सनातन संस्थेचा सभासद व साधक नाही, असा खुलासा बांदिवडेकर यांनी केला. भंडारी समाजातील एक घटक म्हणून आपण त्यांच्यासोबत होतो. यापुढेही सनातनशी आपला संबंध नसेल, असे ते म्हणाले. हा विषय आता आपल्यासाठी संपल्याचे ते म्हणाले. कमीत-कमी वेळेत जास्तीतöजास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करणार असून काँग्रेस, राष्ट्रवादी व आघाडीच्या घटक पक्षांचे कार्यकर्ते एकाच वाहनातून प्रचार करतील, असे त्यांनी सांगितले. विकास सावंत व काका कुडाळकर यांनीही विचार मांडले.