|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘त्या’ महिलेचा खूनच, गुन्हा दाखल

‘त्या’ महिलेचा खूनच, गुन्हा दाखल 

अत्याचार करून खून केल्याचा संशय : परराज्यातील बेपत्तांची माहिती मागविली

प्रतिनिधी / सावंतवाडी:

आंबोली घाटात सापडलेल्या अनोळखी महिलेचा खूनच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. वैद्यकीय अहवालात तसे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी शुक्रवारी भादंवि कलम 302 व 201 चा गुन्हा अज्ञाताविरोधात दाखल केला आहे.

खून झालेली महिला 35 ते 40 वयोगटातील असून तिला आंबोलीत आणून तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर महिला परराज्यातील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी परराज्यातील सर्व बेपत्ता महिलांची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास लवकरच करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक सुनील धनावडे यांनी स्पष्ट केले.

आंबोली घाटात दोन दिवसांपूर्वी एका महिलेचा मृतदेह स्थानिक नागरिकांना आढळून आला होता. हा मृतदेह रेस्क्यू टीमच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आला होता. सावंतवाडी कुटिर रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यात मृतदेहावर मारहाणीच्या खुणा आढळल्या. वैद्यकीय अहवालानुसार व प्रथमदर्शनी पाहणीतून महिलेचा खून झाल्याच्या अंदाजानुसार सावंतवाडी पोलिसांनी खून व पुरावा नष्ट करणे असे दोन गुन्हे नोंदविले आहेत. या गुन्हय़ानुसार खुनाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. सदर महिला 35 ते 40 वयोगटातील असून तिच्या अंगावरील कपडय़ानुसार ती परजिल्हय़ातील अथवा परराज्यातील असावी, असा अंदाज निरीक्षक धनावडे यांनी व्यक्त केला आहे. सदर महिलेला पर्यटनासाठी आणून तिचा खून करण्यात आला असावा, असाही कयास व्यक्त केला जात आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी सांगली, बेळगाव, गोवा, कर्नाटक, विदर्भ येथून माहिती मागविली आहे.