|Monday, June 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पिकविम्याचे 90 लाख अखेर प्राप्त

पिकविम्याचे 90 लाख अखेर प्राप्त 

भावई शेतकरी मंडळाच्या लढय़ाला अभूतपूर्व यश : 144 शेतकऱयांवर झाला होता अन्याय

शेखर सामंत / सिंधुदुर्ग:

 बँक ऑफ इंडिया, वेंगुर्ले शाखेच्या हलगर्जीपणामुळे हक्काच्या पिकविम्यापासून वंचित राहिलेल्या वेंगुर्ले येथील 144 शेतकऱयांना पिकविमा नुकसान भरपाईचे 90 लाख मिळवून देण्यात अखेर भावई शेतकरी मंडळाला यश आले. दोनच दिवसांपूर्वी या 144 शेतकऱयांच्या खात्यात विमा कंपनीमार्फत 90 लाख रुपये नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली.

बँकांच्या बेजबाबदार कारभारामुळे शासनाच्या योजना शेतकऱयांच्या हिताच्या असूनही सर्वसामान्य शेतकऱयांची कशाप्रकारे ससेहोलपट होते, याचे हे अतिशय धक्कादायक उदाहरण आहे. ग्रामीण भागातील शेतकऱयांसाठी काम करणाऱया भावई शेतकरी मंडळाने या अन्यायग्रस्त शेतकऱयांसाठी थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला.

 शासनाच्या हवामानावर आधारित फळ पीक विमा योजना 2017-18 करीता बँक ऑफ इंडियाच्या वेंगुर्ले येथील शाखेतून पीक कर्ज विमा हप्ता विहित मुदतीत विमा कंपनीकडे तत्कालीन शाखाधिकारी यांनी वर्ग करण्यामध्ये कुचराई केल्यामुळे वेंगुर्ले येथील 144 शेतकरी सुमारे 90 लाख इतक्या नुकसान भरपाईपासून वंचित राहिले होते. मात्र संबंधित शेतकऱयांपैकी आवेरा (वेंगुर्ले) येथील काही शेतकऱयांनी भावई शेतकरी मंडळाशी संपर्क साधून बँकेकडून झालेल्या अन्यायाची तक्रार केली. शेतकऱयांवर झालेला अन्याय लक्षात येताच भावई मंडळाने यात लक्ष घालून संबंधित बँक, विमा कंपनी, जिल्हाधिकारी कार्यालय, शासनाचा कृषी विभाग, खासदार, मंत्री ते थेट पंतप्रधान कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला. अखेर आंदोलनाचाही इशारा दिल्यानंतर बँकेला नमते घ्यावे लागले. त्यानंतर पंतप्रधान कार्यालयातील फार्मर्स वेलफेअर विभागातून सूत्रे हलवून अखेर संबंधित विमा कंपनीमार्फत शेतकऱयांच्या नुकसानीचे 90 लाख रुपये त्यांच्या खात्यात जमा झाले.

 भावई शेतकरी मंडळाच्या या कामगिरीबद्दल बोलताना मंडळाचे अध्यक्ष संजय सामंत म्हणाले, हे यश कुणा एकटय़ाचे नसून ते संघटितपणे केलेल्या कामगिरीचे व त्याला शेतकऱयांनी दिलेल्या सहकार्याचे आहे. जिल्हय़ातील शेतकऱयांवर बँका, विमा कंपन्या यांच्यामार्फत वारंवार अन्याय झाला आहे. पण येथील शेतकरी संघटित नसल्यामुळे या अन्यायाविरुद्ध लढणे कठीण बनते. शेतकरी बांधव संघटित झाला, तर अशा लढय़ांच्या माध्यमातून यश मिळविणे सोपे होते.

बँक ऑफ इंडियाच्या याच वेंगुर्ले शाखेने आणखी 25 पीक कर्जदार शेतकऱयांवर जो अन्याय केला आहे, त्याला वाचा फोडून संबंधित शेतकऱयांना न्याय मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. या सर्व लढय़ात कमलाकांत शेणई, रमेश पटवर्धन, नितीन कुडाळकर यांनी भावई शेतकरी मंडळामार्फत मोलाचे योगदान दिले. तर कर्जदार शेतकरी अशोक चव्हाण, अविनाश दुतोंडकर, सुनील नाईक, समीर केळूसकर, भिकाजी गावडे, दाजी नाईक, राजू वाडेकर आदींचे सहकार्य लाभले. जिल्हाधिकारी तसेच खासदार विनायक राऊत आणि दिल्लीस्थित ग्यानचंद यांचेही सहकार्य मोलाचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.