|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पक्षकाराची उत्तम बाजु मांडणाऱया वकीलाला महत्व

पक्षकाराची उत्तम बाजु मांडणाऱया वकीलाला महत्व 

प्रतिनिधी / बेळगाव

न्यायालयात आपल्या पक्षकाराची बाजु उत्तम पध्दतीने मांडणाऱया वकिलाला महत्व असते. त्यामुळे कॉलेज जीवनापासूनच कायद्याच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमधून आपले संभाषण कौशल्य वाढविण्याची गरज आहे. कोणतेही यश हे झटपट मिळत नसते. त्यासाठी मेहनत ही घ्यावीच लागते. असे प्रतिपादन हुबळी येथील कर्नाटक लॉ युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरु प्रा. डॉ. पी. ईश्वरभट्ट यांनी केले.

केएलई सोसायटी संचलित आर. व्ही. बेल्लद लॉ कॉलेजतर्फे शुक्रवारी राष्ट्रीय स्तरावरील कायदा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उद्घाटनानंतर झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर बेंगळूर येथील कर्नाटक बार कौन्सिलचे चेअरमन ऍड. के. बी. नाईक, बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. एस. एस. किवडसण्णावर, कॉलेजेच्या संचालक मंडळाचे चेअरमन ऍड. आर. बी. बेल्लद व प्राचार्य डॉ. बी. जयसिंह उपस्थित होते.

ते म्हणाले, प्रशिक्षणातून विद्यार्थी घडत जात असतो. त्यामुळे आपल्या संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी हे राष्ट्रीय स्तरावर उत्तम काम करु शकतील, असे घडवावेत. शालेय अभ्यासक्रम त्याचबरोबर उपक्रमांबद्दल विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी होण्यास मदत होते. स्वतःमधील अंगीभूत गुण ओळखून विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात नाव कमवावे, असे भट्ट यांनी सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. उमा हिरेमठ यांनी उपस्थितांचे स्वागत केले. प्रा. विजय मुरदुंडी यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. तीन दिवस चालणाऱया या महोत्सवामध्ये गोवा व कर्नाटकातील 23 हून अधिक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. विविध स्पर्धा नंतर शनिवारी या स्पर्धेचा बक्षीस वितरण होणार आहे.