|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विजापुरात भीषण अपघातात 9 ठार

विजापुरात भीषण अपघातात 9 ठार 

वार्ताहर/ विजापूर

विजापूर जिल्हय़ातील सिंदगी तालुक्यातील चिकसिंदगीजवळ विजापूर-गुलबर्गा राष्ट्रीय महामार्ग क्र. 218 वर शुक्रवारी पहाटे 5 च्या सुमारास प्रुझर व ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात 9 जण जागीच ठार झाले तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील मृत व जखमी चित्तापूर (जि. गुलबर्गा) येथील रहिवासी आहेत. जखमीत ट्रकमधील चालक व वाहकाचाही समावेश आहे.

  याबाबत समजलेली माहिती अशी, चित्तापूरचे तरुण होळीची सुटी असल्याने प्रुझरमधून गोव्याला पिकनिकसाठी गेले होते. गोव्यातील पिकनिक संपवून ते गुरुवारी सायंकाळी परतीच्या प्रवासाला निघाले होते. शुक्रवारी पहाटे त्यांच्या भरधाव प्रुझरने (क्र. केए/34/एन/6707) सिंदगी तालुक्यातील चिकसिंदगीजवळील महामार्गावर समोरून येणाऱया ट्रकला (क्र./एमपी/37/टीई/9199) जोराची धडक दिली. या भीषण अपघातात प्रुझरमधील 9 जण जागीच ठार झाले तर 6 जण जखमी झाले. जखमीत ट्रकचालक व वाहकाचा समावेश आहे. ट्रक गुलबर्ग्याहून विजापूरकडे  निघाला होता. तर प्रुझर विजापूरहून चित्तापूरला निघाली होती. जखमींना विजापूरच्या सरकारी इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 श्रीनाथ ईश्वरप्पा नालवार (वय 25, रा. चित्तापूर), अंबरीश लक्ष्मण दोरे (वय 30, रा. चित्तापूर) युनूस सर्वर पटेल (वय 25, रा. चित्तापूर), सागर शंकरप्पा दोडमनी (वय 22, रा. चित्तापूर), चाँद मशाकसाब मुजावर (वय 24, रा. चित्तापूर), गुरुराज साबण्णा हकीम (वय 35, रा. चित्तापूर), शाकीर अब्दुलरहीम शेख (वय 27, रा. चित्तापूर), अजीम अब्दुलरहीम शेख (वय 35, रा. चित्तापूर), मुन्सुफ सर्वर पटेल (वय 28, रा. चित्तापूर) अशी मृतांची नावे आहेत.

  तर मंजूर सर्वर पटेल (वय 32) आकाश लक्ष्मण दोरे (वय 20), मल्लिकार्जुन बसवराज जमादार (वय 29), सद्दाम (वय 25 सर्व रा. चित्तापूर) तसेच ट्रकमधील चालक सोपेठी आनंद नागेश्वरराव (वय 25) व वाहक साजीद इस्माईल साजीद खादरबाबू (वय 22, दोघे रा. आंध्रप्रदेश) अशी जखमींची नावे असून त्यांना जिल्हा इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

  अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी जिल्हा पोलीसप्रमुख प्रकाश निकम, सिंदगीचे सीपीआय सी. पी. द्यामप्पा व सहकाऱयांनी भेट दिली. हा अपघात इतका भयानक होता की, मृत व्यक्ती प्रुझरमध्येच अडकले होते. तसेच प्रुझरचा पूर्णपणे चेंदामेंदा झाला होता. अपघातानंतर काहीवेळ वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने दोन्ही वाहने बाजूला करून मृत व जखमींना बाहेर काढले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून जखमींना इस्पितळात दाखल केले.  

 गेल्या दोन वर्षात अनेक अपघात

या राष्ट्रीय महामार्ग क्र. 218 वर चिकसिंदगीजवळ गेल्या दोन वर्षात अनेक अपघात झाले आहेत. यात अंदाजे 50 पेक्षा जास्त जण मृत पावले आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून अपघातात घट झाली असून पोलिसांकडूनही उपाययोजना राबविण्यात येत आहेत.   

  दोन वर्षापूर्वीच्या अपघाताची पुनरावृत्ती

दोन वर्षांपूर्वी पौर्णिमेदिवशी याच ठिकाणी 18 जण ठार झाले होते तर 5 जण गंभीर जखमी झाले होते. आता पौर्णिमेनंतर दोन दिवसातच पुन्हा अपघात आणि त्यामध्ये 9 जण ठार तर 6 जखमी झाले आहेत. यामुळे पूर्वीच्या अपघाताची पुनरावृत्तीच झाली आहे.  

नातेवाईकांचा एकच आक्रोश

राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातातील मृतदेह शवविच्छेदनासाठी विजापूर सरकारी इस्पितळमध्ये पाठवून देण्यात आले होते. त्याठिकाणी मृतांच्या नातेवाईकांनी इस्पितळात दाखल होऊन एकच आक्रोश केला. नातेवाईकांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. सायंकाळी मृतांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.