|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » सासोलीतील बेकायदा वृक्षतोडीवर होणार कारवाई

सासोलीतील बेकायदा वृक्षतोडीवर होणार कारवाई 

वनक्षेत्रपाल अशोक गमरे यांची माहिती

तोडलेले लाकूड करणार जप्त

‘तरुण भारत’ वृत्ताची दखल

लवू परब / दोडामार्ग:

दोडामार्ग तालुक्यातील सासोली येथे सामाईक जमिनीतील शेकडो एकर जागा एका परप्रांतीयाने करारावर घेऊन त्या जागेतील हजारोच्या संख्येत झाडांची मोठय़ा प्रमाणात कत्तल केली. याबाबत काही ग्रामस्थांनी वारंवार दोडामार्ग वनविभागाकडे लेखी तक्रार करूनही तसेच तालुक्यात इकोसेन्सिटिव्ह झोन लागू असताना या वृक्षतोडीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष केले होते. मात्र ‘तरुण भारत’ मध्ये वृत्त प्रसिद्ध येताच त्या परप्रांतीयाला दंड करून त्या जागेतील तोड केलेले लाकूड जप्त करणार असल्याचे वनक्षेत्रपाल अशोक गमरे यांनी सांगीतले.

दोडामार्ग तालुक्यात गेल्या दोन महिन्यापासून उच्च न्यायालयाने सरसकट वृक्षतोड बंदी लागू केली होती. त्यामुळे तालुक्यात एकही वृक्ष तोडता येणार नसल्याचे वनविभागाकडुन सांगण्यात आले. एकीकडे वृक्षतोडीस बंदी असताना वनविभागाने या हजारो वृक्षतोडीकडे कसे काय दुर्लक्ष केले? असा सवाल उपस्थित केला जात आहे. सासोली येथील सामाईक जमीन एका परप्रांतीय केरळीयनाने करारावर घेऊन त्या ठिकाणी अननस लागवडीसाठी त्याने त्या जागेतील सर्व झाडांची मोठय़ा प्रमाणात कत्तल करून सर्व जमीन भूईसपाट केली. सासोली गावातील त्या सामाईक जमिनीतील काही जमीन मालकांचा जमीन देण्यास विरोध होता. मात्र, त्या केरळीयनाने ती जागा करावर ताब्यात घेऊन त्या जागेतील सर्व झाडे तोडून मोठय़ा प्रमाणात निसर्गाची हानी केली.

वृक्षतोडीबाबत तक्रार असतानाही वनविभागाचे दुर्लक्ष

 सासोली गावातील सामाईक जमिनीत एका परप्रांतीय माणसाने जमीन करारावर घेऊन त्या ठिकाणी अननस लागवडीसाठी त्या जागेतील सर्व झाडे वृक्षतोडीस बंदी असताना देखिल तोडली. त्या सामाईक जमिनीतील काही विरोधकांनी दोडामार्ग वनविभागाला कळविले होते. मात्र, वनविभागाने त्या वृक्षताडीवर कोणतीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्याच तक्रारदारांनी वनविभागात लेखी तक्रार दिली. सासोली गावात गेल्या तीन महिन्यापासून मोठय़ाप्रमाणात वृक्षतोड सुरू असल्याचे फोटो व व्हिडिओ वनविभागाला तकारदारांकडून दाखविण्यात आले. मात्र, दोडामार्ग वनविभागाने या वृक्षतोडीवर कोणतीच कारवाई नकरता उलट त्या परप्रांतीय युवकाला पाठिशी घालण्याचे काम केल्याचा आरोप तक्रारदारांकडून होत आहे.

चारदिवसात कारवाई करणार- गमरे

दरम्यान, वनक्षेत्रपाल अशोक गमरे यांच्याशी संपर्क साधला असता सासोली येथील वृक्षताडीवर येत्या चार दिवसात कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. तसेच त्या ठिकाणी तोडलेल्या झाडांचे नग जप्त करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. चार ते पाच महिन्यापासून सुरू असलेल्या या वृक्षतोडीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगीतले.

बेकायदेशीर वृक्षतोड थांबणार तरी कधी ?

 दोडामार्ग तालुक्यात इकोसेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यानंतर सरसकट वृक्षतोड बंदी घालण्यात आली. मात्र, असे असताना तालुक्यात बेकायदेशीर वृक्षतोड कशी काय होते? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वनविभागाच्याच आशीर्वादाने ही वृक्षतोड केली जात असल्याचा आरोप निसर्गप्रेमींनी केला आहे. तालुक्यात इकोसेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यानंतर त्याचा निसर्गावर काहीच परिणाम होत नाही तर त्या ईकोसेन्सिटिव्हचा उपयोग तरी काय? असा ही प्रश्न निसर्गप्रेमींनी केला आहे.