|Monday, June 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » केरळमधून निवडणूक लढविणार राहुल?

केरळमधून निवडणूक लढविणार राहुल? 

वायनाड लोकसभा मतदारसंघाचे नाव चर्चेत

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम 

 काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे अमेठीसह आणखी एका मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सातत्याने सुरू आहे. काँग्रेसचे महासचिव आणि केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांच्या विधानानंतर याविषयक चर्चेने जोर पकडला आहे. राहुल गांधी यांना वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची विनंती करण्यात आल्याची माहिती चंडी यांनी दिली आहे. दक्षिण भारतातील 4 राज्ये आंध्रप्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि कर्नाटकात काँग्रेसचा जनाधार वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला जाणार असल्याचे मानले जातेय.

राहुल यांना वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची विनंती करण्यात आल्याचे चंडी म्हणाले. राहुल हे यापूर्वी महाराष्ट्रातील नांदेड किंवा कर्नाटकातील एखाद्या मतदारसंघातून निवडणूक लढवतील असा कयास वर्तविण्यात येत होता. वायनाड मतदारसंघातून काँग्रेस नेते एम.एल. शाहनवाज हे सलग दोनवेळा विजयी झाले आहेत. 2008 च्या पुनर्रचनेनंतर हा मतदारसंघ अस्तित्वात आला होता. कन्नूर, मलाप्पुरम आणि वायनाड क्षेत्रांचा या मतदारसंघात समावेश होता. केरळ काँग्रेस अध्यक्ष मुल्लापल्ली रामचंद्रन यांनीही राहुल हे वायनाड मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचा दावा केला आहे.

दक्षिण भारतावर काँग्रेसची नजर

काँग्रेस अध्यक्षांशी मागील एक महिन्यापासून चर्चा करण्यात येत होती. प्रारंभी ते उमेदवारीस तयार नव्हते, पण आता त्यांनी विनंती मान्य केल्याचे रामचंद्रन यांनी सांगितले आहे. राहुल यांनी केरळमधील मतदारसंघातून निवडणूक लढविल्यास नजीकच्या मतदारसंघांमध्ये वातावरणनिर्मिती होऊन काँग्रेसला लाभ होईल, असे पक्षाला वाटत आहे. विशेषकरून दक्षिण भारतात राहुल यांनी उमेदवारी स्वीकारल्यास उत्तर भारतात कमकुवत असलेल्या काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे.

दोन उमेदवारांची घोषणा शिल्लक

केरळच्या 20 लोकसभा मतदारसंघांपैकी 16 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवत आहे. पक्षाने 14 उमेदवारांची घोषणा केली असून वायनाड आणि वडाकरा येथील उमेदवार अद्याप घोषित केलेले नाहीत.

नरेंद्र मोदींचे अनुकरण

मागील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि वडोदरा या दोन मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या पार्श्वभूमीवर राहुल यांनीही अमेठीसह दक्षिण भारतातील मतदारसंघाची निवड करावी, अशी मागणी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. राहुल यांनी मार्च 2004 मध्ये राजकारणात प्रवेशाची घोषणा केली होती. ते सलग तीनवेळा अमेठी मतदारसंघातून निवडून आले आहेत.