|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा-परवाना रद्द

आचारसंहितेचे उल्लंघन केल्यास फौजदारी गुन्हा-परवाना रद्द 

प्रतिनिधी/ बेळगाव

आचारसंहितेचे उल्लंघन करणाऱया बेळगाव जिल्हय़ातील हॉटेल, बार-रेस्टॉरन्ट आणि चित्रपटगृहांच्या मालकाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. तसेच परवानाही रद्द करण्याचा इशारा चिकोडी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकारी आणि जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी दिला आहे.

आचारसंहिता पालन करण्यासंबंधी शनिवारी जिल्हा पंचायत सभागृहात हॉटेल, बार-रेस्टॉरन्ट, चित्रपटगृह आणि मंगल कार्यालय मालक-व्यवस्थापकांची विशेष बैठक बोलावण्यात आली होती. याप्रसंगी बोलताना जिल्हा स्वीप समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी विविध सूचना केल्या. हॉटेल आणि बारमध्ये टोकन आधारित व्यवहार चाललेला आढळल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. निवडणूक संदर्भात आचारसंहितेचे उल्लंघन करण्याबरोबरच कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार केल्याचे आढळल्यास तात्काळ संबंधित खात्याचे अधिकारी किंवा निवडणूक परिवेक्षक पथकाला माहिती देण्यात यावी. निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने सर्व प्रकारची तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी यावेळी दिली.

कौटुंबिक, खासगी कार्यक्रमांसाठी निर्बंध नाही

मंगल कार्यालयात लग्न समारंभ, वाढदिवस, वार्षिकोत्सव यासह अन्य कौटुंबिक आणि खासगी कार्यक्रमांसाठी कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. मात्र या कार्यक्रमांच्या नावाखाली राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेवण किंवा अन्य व्यवस्था केल्याचे आढळल्यास संबंधित मंगल कार्यालयाच्या मालकाविरोधात खटला दाखल करण्यात येईल, असा इशारा डॉ. राजेंद्र के. व्ही. यांनी दिला.

बार-रेस्टॉरन्ट वेळापत्रकानुसारच सुरू ठेवा

अबकारी खात्याचे उपायुक्त अरुणकुमार यांनी परवानाधारक बार-रेस्टॉरन्ट वेळापत्रकानुसारच सुरू ठेवावेत. दैनंदिन व्यवहाराची माहिती संग्रहित करावी, अशी सूचना बार आणि रेस्टॉरन्टच्या मालकांना केली. अबकारी खात्याने दिलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशाराही अरुणकुमार यांनी यावेळी दिला.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा निवडणूक अधिकारी आणि जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी होते. मतदान प्रक्रियेच्या 48 तास आदी वसतीसाठी कोणीही हॉटेलमध्ये (लॉजिंग-बोर्डींग) आल्यास खोली देण्यासाठी त्यांच्याकडून मतदान ओळखपत्र घेणे बंधनकारक असल्याची सूचना त्यांनी केली. मतदान ओळखपत्र घेतल्यास ही व्यक्ती कोणत्या मतदारसंघातील आहे, हे ओळखता शक्य होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

आयोगाकडे तक्रार करण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला

निवडणुकीची जाहिरात आणि प्रचार करण्यासाठी एमसीएमसी प्रि-सर्टीफिकेशन घेणे बंधनकारक आहे. कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यासाठी पूर्व अनुमती प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे, अशी सूचना चित्रपटगृह मालक आणि केबल ऑपरेटरना जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी  केली. निवडणुकीत आचारसंहितेचे भंग होत असल्याचे आढळल्यास याबाबत आयोगाकडे तक्रार करण्याचा हक्क प्रत्येक नागरिकाला आहे, असेही त्यांनी सांगितले.

बैठकीस प्रोबेशनरी आएएस अधिकारी भंवरसिंग मीना, अतिरिक्त प्रादेशिक आयुक्त रमेश कळसद, महापालिका आयुक्त इब्राहिम मैगूर, एमसीसी नोडल अधिकारी जगदीश रुगी, जि. पं. चे मुख्यलेखाधिकारी परशुराम दुडगुंटी, नगरविकास प्राधिकारचे आयुक्त प्रितम नसलापूरे यांच्यासह सिने एक्झिब्युटर्स संघाचे अध्यक्ष अविनाश पोतदार, हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेगडे यांच्यासह जिल्हय़ातील बार-रेस्टॉरन्ट, चित्रपटगृह आणि मंगल कार्यालयाचे मालक-व्यवस्थापक उपस्थित होते.