|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » माढ्यातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर फायनल, संजय शिंदेंशी लढत

माढ्यातून भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर फायनल, संजय शिंदेंशी लढत 

ऑनलाईन टीम /  मुंबई :

 काँग्रेसचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना भाजपाकडून माढ्यातून उमेदवारी दिली जाणार आहे. निंबाळकर उद्या भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. निंबाळकर यांनी पक्ष सोडण्याचा घेतलेला निर्णय काँग्रेससाठी मोठा झटका मानला जात आहे. माढा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. त्यामुळे निंबाळकर यांच्या भाजपा प्रवेशाचा फटका राष्ट्रवादीलादेखील बसणार आहे. 

काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे खासदार आणि माढ्यातील मातब्बर नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर आता काँग्रेसला मोठा हादरा बसला. दोन महिन्यांपूर्वीच काँग्रेसच्या सातारा जिल्हाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर घेतलेल्या रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला. ते उद्या (सोमवारी) मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांना माढ्यातून उमेदवारी दिली जाणार असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी सोबत बोलताना दिली. याआधी राष्ट्रवादीचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह यांनी भाजपात प्रवेश केला. तेव्हा त्यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा होती. रणजितसिंह यांच्या पक्षप्रवेशावेळी मोहिते-पाटील कुटुंबाचा मान राखला जाईल, असे  म्हणत मुख्यमंत्र्यांनी तसे संकेतही दिले होते. पण आतापर्यंत भाजपाबरोबर असलेल्या संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीची वाट धरून उमेदवारी मिळवली. दुसरीकडे रणजितसिंह यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानं निंबाळकर यांनी उमेदवारीसाठी भाजपाची वाट धरली. ते शिवसेनेचे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे पुत्र आहेत.