|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » चावडीगल्ली वडगाव कॉर्नरवर जलवाहिनीला गळती

चावडीगल्ली वडगाव कॉर्नरवर जलवाहिनीला गळती 

बेळगाव / प्रतिनिधी

प्रशासनाच्या वतीने पाणी बचावसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असताना शहर आणि परिसरात विविध ठिकाणी जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी गटारात मिसळत आहे.  वडगाव येथील चावडी गल्ली कॉर्नर येथील जलवाहिनीला गळती लागून शेकडो लीटर पाणी अक्षरश: गटारात जात आहे. गेल्या चार दिवसापासून ही परिस्थिती असली तरी जलवाहिनी दुरूस्ती करण्यात आली नाही. यावरून पाणी पुरवठा मंडळाचे अधिकारी पाण्याबाबत किती गंभीर आहेत हे दिसून येत आहे.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने नुकताच ‘जागतिक जल दिवस’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पाण्याचे महत्व सांगण्यात आले मात्र आता पाणी पुरवठा मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱयांनाच पाण्याच्या महत्वाबद्दल सांगण्याची गरज निर्माण झाली आहे. चावडीगल्ली वडगाव कॉर्नरवर गेल्या चार दिवसांपासून जलवाहिनीला गळती लागल्याने पिण्याचे शुद्ध पाणी गटारात मिसळत आहे. याबाबत पाणीपुरवठा मंडळाच्या कर्मचाऱयांना कळविण्यात आले. त्यांनी येवून पाहणीही केली. मात्र जलवाहिनीची दुरूस्ती रविवारपर्यंत झाली नव्हती. यामुळे गेल्या चार दिवसांपासून शेकडो लिटर पिण्याचे पाणी गटारात मिसळत आहे.

एकीकडे पाणी टंचाईचे कारण सांगून नागरिकांना 6 ते 7 दिवस आड पाणी पुरवठा करण्यात येत असताना शहर आणि परिसरातील विविध ठिकाणी फुटलेल्या जल वाहिन्या आणि नादुरूस्त जलवाहिन्या दुरूस्ती करण्याचे काम पाणी पुरवठा मंडळाकडून तात्काळ हाती घेण्यात येत नाही. यामुळे भविष्यात नागरिकांना तिव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.