|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » रेशनच्या तांदळाला भ्रष्टाचाराची ‘कीड’

रेशनच्या तांदळाला भ्रष्टाचाराची ‘कीड’ 

वार्ताहर / जमखंडी

  येथील कुंभार तलावाजवळील एका दुकानावर धाड टाकून रेशनचे धान्य जप्त करून एकास अटक करण्यात आली. नागरी पुरवठा अधिकारी व पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. परिणामी या कारवाईमुळे अद्यापही शासकीय योजनांमध्ये गैरव्यवहार सुरूच असून योजनांना भ्रष्टाचाराची कीड लागल्याचे स्पष्ट होताना सदर भ्रष्टाचाराची कीड समूळ नष्ट करण्यासाठी योग्य उपाययोजना हाती घेताना प्रबोधनाची गरज व्यक्त होत आहे.

   याबाबत समजलेली माहिती अशी, कुंभार तलावाजवळील बागवान संकुलातील एका दुकानात रेशनच्या तांदळाचा साठा करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे नागरी पुरवठा अधिकारी व पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करताना दुकानावर धाड टाकली. या कारवाईत दुकानातील 6.37 क्विंटल रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला असून याची अंदाजे किंमत 9,557 रुपये आहे. या प्रकरणी शौकत नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली.

  परिणामी केंद्र आणि राज्य प्रशासन गोरगरिब आणि सामान्य नागरिकांसाठी विविध योजना राबवित आहे. मात्र अधिकारी आणि कर्मचाऱयांच्या गैरव्यवहारामुळे क्षीरभाग्य, अन्यभाग्य, मध्यान्ह आहार असो की रेशन वितरणातील धान्यात काळाबाजार सुरूच आहे. अशा योजनांमधील साहित्य परस्पर खासगी दुकानात विकण्यात येत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. अशांवर कठोर कारवाईकरण्याबरोबरच शासकीय योजनांना लागलेली भ्रष्टाचाराची कीड रोखण्याची गरज सर्वसामान्यांतून व्यक्त होत आहे.