|Wednesday, June 19, 2019
You are here: Home » Top News » टोपी आणि शिट्टी आणून देतो, चौकीदारी करा; अकबरुद्दीन ओवेसींचा मोदींवर निशाणा

टोपी आणि शिट्टी आणून देतो, चौकीदारी करा; अकबरुद्दीन ओवेसींचा मोदींवर निशाणा 

ऑनलाईन टीम / हैदराबाद :

  लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसतशी राजकीय नेत्यांच्या प्रचाराला धार चढू लागली आहे. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कायम हल्लाबोल करणारे एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांनी आता चौकीदार शब्दावरुन जोरदार टीकास्त्र सोडले आहे. मोदींनी माझ्याकडे यावे. मी त्यांना टोपी आणि शिट्टी देईन, असा खोचक टोला ओवेसींनी लगावला आहे. 

सध्या भाजपाचे मै भी चौकीदार कॅम्पेन जोरात आहे. सोशल मीडियावर पंतप्रधान मोदींनी या कॅम्पेनला सुरुवात केली. मोदींच्या या कॅम्पेनवर वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणाऱ्या अकबरुद्दीन ओवेसींनी टीका केली आहे. ‘मी ट्विटरवर चौकीदार नरेंद्र मोदी पाहिलं. त्यांनी त्यांच्या आधार कार्ड आणि पासपोर्टवरसुद्धा चौकीदार असा उल्लेख करायला हवा. आम्हाला पंतप्रधान हवा आहे. चहावाला, पकोडेवाला नको. मोदींना खरंच चौकीदार होण्यात रस असेल, तर त्यांनी माझ्याकडे यावे. मी त्यांना चौकीदाराची टोपी आणि शिट्टी देतो,’ अशा शब्दांमध्ये ओवेसींनी मोदींवर निशाणा साधला.