|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » Top News » अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात?

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात? 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुंबईमध्ये शिवसेना आणि भाजपाच्या कडव्या आव्हानाचा सामना करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे. महायुतीच्या उमेदवारांना तोडीस तोड लढत देण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून तितक्याच तगड्या उमेदवारांचा शोध सुरू आहे. दरम्यान, उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाचे दिग्गज नेते गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात प्रसिद्ध अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिला उमेदवारी देण्याच्या हालचाली काँग्रेसकडून सुरू झाल्याचे वृत्त आहे. 

2014 साली झालेल्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी उत्तर मुंबई मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला होता. या मतदारसंघात उत्तर भारतीय आणि गुजराती मतदारांची संख्या लक्षणीय असून, ते भाजपाचे पारंपरिक मतदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात गोपाळ शेट्टींना आव्हान देण्यासाठी काँग्रेसकडून ग्लॅमरस चेहऱ्याचा शोध सुरू होता. आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांच्यां नावांचीही उत्तर मुंबईतून उमेदवारीसाठी चाचपणी झाली होती. अखेरीस उर्मिला मातोंडकर हिला रिंगणात उतरवण्याचा निर्णय झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.