|Monday, June 24, 2019
You are here: Home » Top News » काँग्रेसने लोकसभा निवडणूक जिंकल्यास पाकिस्तान दिवाळी साजरी होईल : गुजरात मुख्यमंत्री

काँग्रेसने लोकसभा निवडणूक जिंकल्यास पाकिस्तान दिवाळी साजरी होईल : गुजरात मुख्यमंत्री 

ऑनलाईन टीम / अहमदाबाद :

लोकसभा निवडणुकीत चुकून काँग्रेसला यश मिळाल्यास पाकिस्तानात दिवाळी साजरी होईल, असे विधान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी केले आहे. ‘येत्या निवडणुकीत असे काही घडणार नाही. पण 23 मे रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आणि त्यात चुकून काँग्रेसचा विजय झाला, तर पाकिस्तानात आनंद साजरा होईल. कारण ते (काँग्रेस) त्यांच्याशी संबंधित आहेत,’ असे रुपानी यांनी मेहसाण्यात भाजपाच्या विजय संकल्प रॅलीला सुरुवात करताना म्हटले.

 

देशातील जनता मोदींच्या पाठीमागे उभी राहील आणि 23 मे रोजी जाहीर होणाऱ्या निकालात त्यांनाच विजयी करेल, असा विश्वास गुजरातच्या मुख्यमांत्र्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राइकचे पुरावे मागणारे काँग्रेस नेते सॅम पित्रोडा यांच्यावर शरसंधन साधले. ‘पाकिस्तान दहशतवाद्यांना आश्रय देतो, ही बाब संपूर्ण जगाला माहीत आहे. मात्र पाच-सात जणांच्या कृत्यासाठी पाकिस्तानला दोषी धरणे चुकीचे असल्याचे राहुल गांधींचे शिक्षक असलेल्या पित्रोडांना वाटते. काँग्रेस नेते पाकिस्तानची भाषा बोलत आहेत,’ अशी टीका रुपानी यांनी केली.

 

विरोधक सुरक्षा दलांचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुरक्षा दलांच्या प्रमुखांची विधाने खोटी ठरवून तुम्ही नेमके कोणाचे समर्थन करत आहात?, असा प्रश्न रुपानी यांनी विचारला. जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्मया मसूद अजहरची सुटका एनडीए सरकारनंच केली होती, या राहुल गांधींच्या विधनावरदेखील त्यांनी भाष्य केले. काँग्रेसने त्यांच्या सत्ताकाळात अनेक दहशतवाद्यांची सुटका केल्याचे ते म्हणाले. काँग्रेसने मतपेढीचं राजकरण करत फुटीरतावाद्यांना प्रोत्साहन दिल्याचा आरोप त्यांनी केला.